...तशी परिस्थिती पुन्हा उद्भवायला नको; कल्याण-डोंबिवलीत कनेक्टिव्हिटीसाठी काय करावे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 06:47 IST2026-02-09T06:46:50+5:302026-02-09T06:47:10+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेने आपल्या हद्दीअंतर्गत वाहतूक कोंडीवर अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

...तशी परिस्थिती पुन्हा उद्भवायला नको; कल्याण-डोंबिवलीत कनेक्टिव्हिटीसाठी काय करावे?
सीताराम कुंटे
माजी मुख्य सचिव
मागील दोन वर्षे कल्याण गायन समाजाच्या शताब्दी महोत्सवाचे अध्यक्षपद भूषविताना माझे कल्याण-डोंबिवली परिसरात बऱ्याचवेळा जाणे-येणे झाले. प्रत्येक प्रवासावेळी हे आवर्जून निदर्शनास आले की, कल्याण-डोंबिवली हे मुंबईचे बेडरूम असल्यासारखे आहे; परंतु त्या शहरांची कनेक्टिव्हिटी अत्यंत तोकडी आहे. परिणामी, ही शहरे आपल्या पूर्ण क्षमतेने विकसित होऊ शकत नाहीयेत.
कल्याण-डोंबिवली परिसर विकसित झाला त्याला प्रमुख कारण ठरले तेथील परवडणाऱ्या घरांची उपलब्धता. ज्या काळात मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून नावारूपाला येत होती, त्या काळात मुंबईत काम करणारी अनेक पगारदार मंडळी परवडणाऱ्या घरांच्या आकर्षणाने कल्याण-डोंबिवलीत राहायला गेली. मध्य रेल्वेच्या लोकल सेवांमुळे पगारदारांना मुंबईत नोकरीसाठी येणे-घरी जाणे सुकर झाले. त्यामुळेच हा परिसर मुंबईचे बेडरूम असल्याचे बोलले जाऊ लागले. मात्र कालांतराने यात बराच बदल झाला.
रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्यामुळे वस्ती वाढली. साहजिकच वाहतूक कोंडी वाढीस लागली. जवाहरलाल नेहरू पोर्ट स्थापन झाले. त्यामुळे वाहतूक प्रचंड वाढली. मात्र हे सगळे घडत असताना या संपूर्ण परिसरात पायाभूत सुविधांची जी गुंतवणूक आवश्यक होती ती झाली नाही. जुना आग्रा रोड, कल्याण-शीळ रस्ता, भिवंडी बायपास अशा रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. काटई नाका आणि शीळ फाटा याठिकाणी तर प्रचंड वाहतूक कोंडी होते. कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी एमएमआरडीएने अनेक योजना हाती घेतल्या आहेत. त्यात प्रामुख्याने कल्याण रिंग रोड, ऐरोली कटाई बोगदा, मानकोली पूल आणि मेट्रो लाईन क्रमांक १२ यांचा समावेश आहे. मेट्रो लाईन १२ ही २४ किलोमीटरची आणि १९ स्थानकांची आहे. या मेट्रोमुळे डोंबिवली एमआयडीसीतील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेने आपल्या हद्दीअंतर्गत वाहतूक कोंडीवर अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. कल्याण सॅटीस म्हणजे स्टेशन एरिया सुधारणा प्रकल्प हा स्टेशनजवळची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा आहे. रेल्वे लाईनवरून रस्तेपूल बांधण्यात येणार आहेत. त्यात रेतीबंदर-मोटेगाव येथे ४ लेनचा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ठाकुर्ली रेल्वे गेट ते म्हसोबा चौक उड्डाणपूल बांधल्यास वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. हे सगळे प्रयत्न स्तुत्य आहेत. मात्र या प्रकल्पांची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने होणे आवश्यक आहे. कामांची गुणवत्ता चांगली ठेवली पाहिजे आणि भ्रष्टाचारावर प्रभावी अंकुश ठेवला गेला पाहिजे. अन्यथा, पलावा उड्डाणपुलाचा जो अनुभव आपण अलिकडेच घेतला आहे, तसाच या प्रकल्पांच्या संदर्भातही पाहायला मिळेल. पलावा उड्डाणपूल उद्घाटनाच्या आठव्या दिवशी बंद करावा लागला, कारण काम सुमार दर्जाचे होते. तशी परिस्थिती पुन्हा उद्भवायला नको, याची खबरदारी प्रशासनाने घेणे आवश्यक आहे.