शिंदेसेना ६९, भाजप ५३ जागांचा शिंदेसेनेचा प्रस्ताव : दोघेही ठाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 09:38 IST2025-12-24T09:37:28+5:302025-12-24T09:38:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेत युती करण्याबाबत प्रमुख पदाधिकाऱ्यांची रविवारी बैठक झाली. या ...

शिंदेसेना ६९, भाजप ५३ जागांचा शिंदेसेनेचा प्रस्ताव : दोघेही ठाम
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेत युती करण्याबाबत प्रमुख पदाधिकाऱ्यांची रविवारी बैठक झाली. या बैठकीत भाजपने १२२ पैकी ८३ जागा मागितल्या. तर शिंदेसेनेकडे ६९ माजी नगरसेवक असून, भाजपकडे ५३ माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे हे वास्तव स्वीकारून युती करावी, असे शिंदेसेनेचे म्हणणे आहे. दोन्ही पक्ष आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने चर्चेतून काहीच निष्पन्न झाले नाही. बैठकीचा पहिला दिवस चहापानावरच मावळला.
कल्याणमध्ये ओक बागेत झालेल्या बैठकीला भाजपतर्फे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, निवडणूक प्रमुख नाना सूर्यवंशी, कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, नरेंद्र पवार, राहुल दामले हे तर शिंदेसेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे, आ. राजेश मोरे, नीलेश शिंदे, रवी पाटील आदी हजर होते.
असे होते चर्चेतले पर्याय
भाजपने मागितल्या ८३ जागा व उर्वरित ३९ शिंदेसेनेने घ्याव्यात, असा पर्याय मांडला. त्याला शिंदेसेनेने नकार दिला.
शिंदेसेनेने दिलेल्या पर्यायात त्यांच्याकडे ६९ माजी नगरसेवक आहेत, तर भाजपकडे ५३ माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे हा फॉर्म्युला स्वीकारावा आणि युती करावी, असा प्रस्ताव शिंदेसेनेने भाजप समोर ठेवला. त्याला भाजपने नकार दिला.
हा पर्याय नको असेल तर आता दोन्ही पक्षांनी आपापल्या पक्षात जे आयात केलेले उमेदवार आहेत, त्यात जो कोणी तुल्यबळ असेल त्याला उमेदवारी द्यावी व तिढा सोडवावा, असा प्रस्ताव मांडला.
महापालिका निवडणुका २०१५ मध्ये झाल्याने आता युतीची चर्चा शून्यापासून करणे आवश्यक आहे. भाजपकडे सध्या ५१ व शिंदेसेनेकडे ४९ माजी नगरसेवक आहेत, हे वास्तव स्वीकारून या १०० जागा वगळता उर्वरित २२ जागांवर समसमान वाटप करायचे, असा प्रस्ताव चर्चेत पुढे आला.