रवींद्र चव्हाणांनी शब्द दिला, १०० टक्के भाजपाचं तिकीट तुम्हालाच, मग अचानक रात्री काय घडलं?
By प्रविण मरगळे | Updated: January 1, 2026 12:12 IST2026-01-01T12:11:56+5:302026-01-01T12:12:51+5:30
डोंबिवली पश्चिमेत भाजपाकडून २ टर्म नगरसेवक राहिलेले शैलेश धात्रक आणि त्यांची पत्नी मनीषा धात्रक यांना पक्षाने उमेदवारीचा शब्द देत ऐनवेळी काँग्रेसमधून आलेल्यांना उमेदवारी दिली

रवींद्र चव्हाणांनी शब्द दिला, १०० टक्के भाजपाचं तिकीट तुम्हालाच, मग अचानक रात्री काय घडलं?
डोंबिवली - राज्यात २९ महापालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यात मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवलीत भाजपा शिंदेसेनेला सोबत घेत महायुतीत निवडणूक लढवत आहे. महापालिका निवडणुकीत कल्याण डोंबिवलीत महायुती होणार का असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. कारण यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष चव्हाट्यावर आला होता. मात्र ठाकरे बंधू यांच्या युतीचं आव्हान समोर असल्याने भाजपा आणि शिंदेसेना यांनी जुळवून घेत कल्याण डोंबिवली महापालिकेत युती केली. मात्र त्याआधी मोठ्या प्रमाणात भाजपा आणि शिंदेसेनेत इतर पक्षातील नेत्यांचे इनकमिंग झाले होते. त्यामुळे ऐनवेळी युतीमुळे दोन्ही पक्षातील इच्छुकांची कोंडी झाली.
डोंबिवली पश्चिमेत भाजपाकडून २ टर्म नगरसेवक राहिलेले शैलेश धात्रक आणि त्यांची पत्नी मनीषा धात्रक यांना पक्षाने उमेदवारीचा शब्द देत ऐनवेळी काँग्रेसमधून आलेल्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे याठिकाणी नाराजीनाट्य रंगलं. धात्रक यांनी शेवटच्या क्षणी मनसेत प्रवेश करत या प्रभाग ६० आणि ६१ मधून उमेदवारी मिळवली. शैलेश धात्रक, मनीषा धात्रक आणि त्यांची कन्या पूजा धात्रक यांनी मनसेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र यानंतर पूजा धात्रक यांनी डोंबिवलीचे आमदार आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर विश्वासघाताचा मोठा आरोप केला आहे.
पूजा धात्रक हिने सोशल मीडियावर पोस्ट करत डोंबिवलीत रंगलेल्या नाट्यमय घडामोडीबाबत सविस्तर भाष्य केले. पूजा धात्रक म्हणाली की, २० वर्ष आई वडील भाजपात एकनिष्ठ होते. २ टर्म नगरसेवकपदाच्या काळात त्यांनी जनतेची सेवा केली. या काळात पक्षाने अनेकदा त्यांना विविध पदांबाबत आश्वासने दिली परंतु प्रत्यक्षात काही दिले नाही हे लहानपणापासून मी माझ्या डोळ्याने पाहिले. पण आई वडिलांनी कधीही पक्षासोबत गद्दारी केली नाही. २८ डिसेंबरला आई वडिलांना कॉल आला, तुम्ही तयारी करा, उमेदवारी तुम्हाला मिळाली आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका असं सांगितले. त्यानंतर आई वडील खुश होते. २९ डिसेंबरला पूर्ण दिवस आई वडील आनंदात होते. आमच्याकडून सगळी तयारी झाली होती फक्त पक्षाचा एबी फॉर्म येणे बाकी होते असं तिने सांगितले.
त्यानंतर आम्ही २९ डिसेंबरला पूर्ण दिवस वाट पाहिली. त्यानंतर त्या मध्यरात्री आई वडिलांना उमेदवारी मिळणार नाही हे कळले. धात्रक यांनी मतदारसंघात काय काय काम केले हे जनतेला माहिती आहे. अचानक असे का घडले, कारण पक्षाला काँग्रेसमधून आलेल्यांना तिकीट द्यायचे होते. त्यांना खुश करायचे होते. इतर पक्षातून आलेल्यांना तिकीट दिले पण पक्षातील नेत्यांना नाही. डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी आम्हाला शब्द दिला होता. त्यांच्या चॅटचे पुरावेही देऊ शकतो. १०० टक्के तिकीट तुम्हाला आहे परंतु अचानक त्यांनी त्यांचा शब्द फिरवला असा आरोप पूजा धात्रक हिने केला.
दरम्यान, आई वडिलांना त्यांच्या कामावर आणि मतदारसंघातील जनतेवर विश्वास आहे. त्यामुळे आम्ही हरणारे नाही तर लढणारे आहोत. ३० डिसेंबरला मी आणि आई वडिलांनी मनसेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपाने आमच्यासोबत जो विश्वासघात केला तो अतिशय भयानक होता असंही पूजा धात्रक हिने सांगितले.