दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते गुण्यागोविंदाने मतदान प्रक्रिया बजावत आहेत, शिंदेसेनेचे आमदार राजेश मोरे यांची प्रतिक्रिया
By मुरलीधर भवार | Updated: January 15, 2026 12:29 IST2026-01-15T12:28:04+5:302026-01-15T12:29:34+5:30
Kalyan Dombivli Municipal Corporation Election: कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक भाजपा आणि शिवसेनेतील जोरदार राड्यानंतर डोंबिवलीतील पॅनल क्रमांक २९ मध्ये दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते गुण्या गोविंदाने सुरळीत मतदान पार पडण्यासाठी काम करत असल्याची प्रतिक्रिया शिंदे सेनेचे आमदार राजेश मोरे यांनी दिली आहे.

दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते गुण्यागोविंदाने मतदान प्रक्रिया बजावत आहेत, शिंदेसेनेचे आमदार राजेश मोरे यांची प्रतिक्रिया
डोंबिवली - कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक भाजपा आणि शिवसेनेतील जोरदार राड्यानंतर डोंबिवलीतील पॅनल क्रमांक २९ मध्ये दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते गुण्या गोविंदाने सुरळीत मतदान पार पडण्यासाठी काम करत असल्याची प्रतिक्रिया शिंदे सेनेचे आमदार राजेश मोरे यांनी दिली आहे. तसेच बऱ्याच वर्षांनंतर होत असलेल्या महापालिका निवडणुकीमुळे मतदानाबाबत नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी असून, ज्येष्ठ नागरिकांसह युवकही उत्स्फूर्तपणे मतदानासाठी सहभागी होत असल्याचे ते म्हणाले. पॅनल क्रमांक २९ मध्ये युतीऐवजी मैत्रीपूर्ण लढत होत आहे. घडलेल्या घटनेचा आम्ही निषेध करतो असे आमदार मोरे यांनी सांगितले.
रविवारी भाजपाचे कार्यकर्ते पॅनल क्रमांक २९ मध्ये पैसे वाटप करीत असल्याचा आरोप शिंदे सेनेचे उमेदवार नितीन पाटील यांनी केला होता. शिंदे सेनेचा आरोप भाजपाने फेटाळून लावला होता. त्यानंतर पुन्हा भाजप उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर यांच्यावर प्राणघाटक हल्ला केल्या प्रकरणी या पॅनल मधील शिंदे सेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि त्यांचे भाऊ रवी पाटील यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्या अटकेच्या विरोधात शिंदे सेनेने प्रचंड गोंधळ रुग्णालयात घातला होता. पोलिसांनी रवी पाटील आणि नितीन पाटील यांना अटक केली आहे मात्र या दोघांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे या पॅनल मधील मतदानाची टक्केवारी कमी होणार की वाढणार? मतदार मतदानासाठी बाहेर पडणार की नाही ? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र आज मतदानाच्या दिवशी शिंदे सेनेचे आमदार मोरे यांनी मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू असल्याची माहिती दिली आहे. मोरे यांच्या या वक्तव्यावर भाजपाकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया अद्याप देण्यात आलेली नाही.