KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 23:52 IST2025-12-30T23:50:54+5:302025-12-30T23:52:40+5:30
Kalyan Dombivli Municipal Corporation Election: राज्यातील महानगरपालिकेसाठी मतदान होण्याआधीच कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेत भाजपच्या रेखा राजन चौधरी यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
राज्यातील महानगरपालिकेसाठी मतदान होण्याआधीच कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेत भाजपच्या रेखा राजन चौधरी यांचा विजय निश्चित मानला जात आहे. रेखा चौधरी यांनी प्रभाग क्रमांक १८ 'अ' उमेदवारीचा अर्ज दाखल केला. परंतु, प्रतिस्पर्धीच मैदानात नसल्याने रेखा चौधरी यांचा मार्ग सुकर झाला आणि त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. रेखा चौधरी यांचा विजय निश्चित झाला असला, तरी ३१ डिसेंबर रोजी निवडणूक आयोगामार्फत कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. त्यानंतरच त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा करण्यात येईल.
कल्याण पूर्वेतील प्रभाग क्रमांक १८ 'अ' ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटासाठी राखीव होती. या जागेसाठी भाजपकडून रेखा राजन चौधरी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत त्यांच्या विरोधात इतर कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा भाजपचा पहिला मोठा विजय मानला जात असून, यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
या बिनविरोध निवडीचे श्रेय भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या विशेष रणनीतीला आणि प्रयत्नांना दिले जात आहे. रेखा चौधरी या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कट्टर कार्यकर्त्या आहेत. तसेच त्या भाजप महिला मोर्चाच्या कल्याण जिल्हाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांच्या या विजयानंतर भाजपने ही हिंदुत्वाचा पहिला विजय असल्याची अधिकृत प्रतिक्रिया दिली.