कल्याण-डोंबिवलीत महायुतीने मतदानाआधीच अर्धी लढाई जिंकली, तब्बल १९ उमेदवार बिनविरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 16:54 IST2026-01-02T16:33:06+5:302026-01-02T16:54:07+5:30
Kalyan Dombivli Municipal Corporation Election: मुंबईजवळच्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये प्रत्यक्ष मतदान होण्यापूर्वीच भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीने अर्धी लढाई जिंकल्याचं चित्र दिसत आहे. येथे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपेपर्यंत महायुतीच्या तब्बल १९ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.

कल्याण-डोंबिवलीत महायुतीने मतदानाआधीच अर्धी लढाई जिंकली, तब्बल १९ उमेदवार बिनविरोध
मुंबईजवळच्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये प्रत्यक्ष मतदान होण्यापूर्वीच भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीने अर्धी लढाई जिंकल्याचं चित्र दिसत आहे. येथे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपेपर्यंत महायुतीच्या तब्बल १९ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. उद्धवसेना, काँग्रेस, अपक्ष आणि मनसेच्या उमेदवारांकडून अर्ज मागे घेण्यात आल्याने महायुतीच्या अनेक उमेदवारांचा निवडणूक न लढवताच महानगपालिकेत प्रवेश झाला आहे. बिनविरोध निवड झालेल्या महायुतीच्या १९ उमेदवारांमध्ये भाजपाच्या १३ आणि शिंदेसेनेच्या ६ उमेदवारांचा समावेश आहे.
१२२ सभासदसंख्या असलेल्या कल्याण डोंबवली महानगरपालिकेमध्ये उमेदवारी अर्जांची छाननी सुरू झाल्यापासूनच अनेक प्रभागांमधील लढती बिनविरोध होण्यास सुरुवात झाली होती. दरम्यान, भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीसमोर उभ्या असलेल्या उद्धवसेना आणि मनसेच्या काही उमेदवारांनी एकापाठोपाठ माघार घेतल्याने आतापर्यंत महायुतीच्या तब्बल १९ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.
बिनविरोध निवडून आलेल्या भाजपाच्या उमेदवारांमध्ये रेखा चौधरी, आसावरी नवरे, रंजना पेणकर, रवीना माळी, सुनिता पाटील, साई शेलार, महेश पाटील, पूजा म्हात्रे, दीपेश म्हात्रे, जयेश म्हात्रे, मंदा पाटील, हर्षदा भोईर, विशू पेडणेकर यांचा समावेश आहे. यापैकी भाजपाचे रेखा चौधरी, आसावरी नवरे, रंजना पेणकर हे उमेदवार सुरुवातीलाच बिनविरोध निवडून आले होते. तर उर्वरित उमेदवार हे उमेदवार नंतरच्या टप्प्यात बिनविरोध निवडून आले.
भाजपा प्रमाणेच शिंदेसेनेच्याही सहा जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. बिनविरोध निवडणून आलेल्या शिंदेसेनेच्या उमेदवारांमध्ये हर्षल मोरे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी, रमेश म्हात्रे, ज्योती मराठे आणि रेश्मा निचळ यांचा समावेश आहे.