शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 14:14 IST2025-12-31T14:13:12+5:302025-12-31T14:14:07+5:30
माजी नगरसेवक उमेश बोरगावकर हे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात होते. त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. पॅनल क्रमांक ६मधून ते इच्छुक होते. मात्र, त्यांची उमेदवारी शिंदसेनेने कापली.

शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक
मुरलीधर भवार -
कल्याण : शिंदेसेनेकडून ५००पेक्षा जास्त इच्छुकांनी अर्ज भरले होते. मात्र, मोजक्या उमेदवारांनाच संधी मिळाल्याने कल्याण-डोंबिवलीत शिंदेसेनेत नाराजी उफाळून आली. ज्यांना अन्य पक्षातून उमेदवारी अर्ज भरायचे होते, त्यांनी भरले. या बंडखोरांची डोकेदुखी शिंदेसेनेला सहन करावी लागेल.
माजी नगरसेवक उमेश बोरगावकर हे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात होते. त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. पॅनल क्रमांक ६मधून ते इच्छुक होते. मात्र, त्यांची उमेदवारी शिंदसेनेने कापली. या पॅनलमधून शिंदेसेनेने माजी नगरसेवक संजय पाटील आणि नीलिमा पाटील यांना उमेदवारी दिली. बोरगावकर यांनी हाती मशाल घेत उद्धवसेनेकडून अर्ज दाखल केला. शिंदेसेनेचे विधानसभा समन्वय श्रेयस समेळ हे पॅनल क्र. ९ मधून इच्छूक होते. मात्र जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांच्या पत्नी अस्मिता यांना उमेदवारी दिली. त्यामुळे समेळ यांच्यासह ५७ पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे दिले आहेत.
शहरप्रमुखाच्या मुलाचा पत्ता कट
कल्याण पश्चिमचे शिंदेसेनेचे शहरप्रमुख रवी पाटील यांचा मुलगा अनिरुद्ध पाटील पॅनल क्रमांक ६ ड मधून इच्छुक हाेते. त्यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, त्यांची उमेदवारी कापली गेली. अनिरूद्ध हे उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत; पण शहरप्रमुख पाटील यांची बहीण प्रमिला पाटील यांना पक्षाने उमेदवारी दिली.
रसाळ यांनी भरला उद्धवसेनेकडून अर्ज
निवडणूक जाहीर झाल्यावर काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला हाेता. त्यांच्या प्रवेशाआधी भाजपचे माजी नगरसेवक उदय रसाळ यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला होता.
पॅनल क्रमांक १२ ड मधून ते इच्छुक होते. मात्र, शिंदेसेनेने या ठिकाणी पोटे यांना उमेदवारी दिली. रसाळ यांनी उद्धवसेनेकडून याच पॅनलमधून उमेदवारी अर्ज दाखल केला.