KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 17:35 IST2026-01-01T17:33:54+5:302026-01-01T17:35:26+5:30
Kalyan Dombivli Municipal Election Result 2026 KDMC: रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी या तीन जणांचा विजय

KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
KDMC Election Result 2026: कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक २४ मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी हे शिवसेनेचे तीन नगरसेवक उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहे. यामुळे यांच्यासमवेत प्रभागात उभे असलेल्या भाजपच्या ज्योती पाटील देखील विजयी झाल्या आहेत. यामुळे कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेनेने आपले खाते उघडले आहे. कल्याण डोंबिवलीत महायुतीचा शतप्रतिशत महापौर बसणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. २४ मधील निवडणूक निकालांनी स्थानिक राजकारणात शिवसेनेचे स्थान अधिक भक्कम केले आहे. या प्रभागात शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले असून भारतीय जनता पक्षाचा एक उमेदवार विजयी झाला आहे. तिन्ही जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्याने शिवसेनेला मिळालेला हा तिहेरी बिनविरोध विजय पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचा आणि शिवसेनेवर असलेल्या जनतेच्या विश्वासाचा विजय असल्याचे बोलले जात आहे. तर या तिन्ही नगरसेवकांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याकडून व्हिडिओ कॉलद्वारे अभिनंदन केले आहे.