"शिंदेसेनेतून हकालपट्टी करा..."; नाराज उमेदवाराचं एकनाथ शिंदेंना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 15:19 IST2025-12-30T15:18:55+5:302025-12-30T15:19:43+5:30
कैलास शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे की, हल्ली देशात, राज्यात आणि शहरात सुरू असलेल्या राजकारणात एकनिष्ठ असणे, कार्य करणे, सुशिक्षित असणे याला महत्त्व नाही. यामुळे त्यांनी मनातील नाराजी व्यक्त केली आहे.

"शिंदेसेनेतून हकालपट्टी करा..."; नाराज उमेदवाराचं एकनाथ शिंदेंना पत्र
कल्याण : केडीएमसी निवडणुकीसाठी पॅनल क्रमांक १८ मधून इच्छुक असलेले शिंदेसेनेचे उमेदवार कैलास शिंदे यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात ‘माझी पक्षातून हकालपट्टी करा’, अशी मागणी केली. या अजब मागणीमुळे त्यांचे पत्र चर्चेचा विषय ठरले.
कैलास शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे की, हल्ली देशात, राज्यात आणि शहरात सुरू असलेल्या राजकारणात एकनिष्ठ असणे, कार्य करणे, सुशिक्षित असणे याला महत्त्व नाही. यामुळे त्यांनी मनातील नाराजी व्यक्त केली आहे.
पैसा असेल तर निवडून येता
उमेदवाराची आर्थिक बाजू मजबूत असेल, तर त्याला महत्त्व आहे. पैसा असेल, तरच तुम्ही निवडून येऊ शकता, असा अलिखित नियम बनला आहे. आर्थिक सक्षम असणे हा महत्त्वाचा गुण माझ्याकडे नाही. त्यामुळे केडीएमसीच्या निवडणुकीत मी उमेदवारी मिळण्यास पात्र नाही. त्यामुळे माझी पक्षातून हकालपट्टी करावी. कैलास शिंदे यांनी २०१५ साली निवडणूक लढविली होती व ते विजयी झाले.
भाजपचे काम करणार नाही
पालिकेत सभागृह नेते आणि गटनेते पद भूषविले होते. महायुतीत भाजप आणि शिंदेसेना एकत्रित निवडणूक लढवित आहे. पॅनल क्रमांक १८ मधून भाजपच्या रेखा चौधरी यांना उमेदवारी दिली. भाजपने नेहमीच शिंदेसेनेच्या विरोधात काम केले. त्यामुळे केडीएमसी निवडणुकीत भाजपचे काम करणार नसल्याचे कैलास शिंदे यांनी सांगितले.
कागदपत्रांची होळी करणार
निवडणूक आयोगाने बहुसदस्य पद्धतीचा निर्णय घेतला. एक पॅनल हा चार सदस्यांचा असल्याने माझ्यासारखा सामन्य कार्यकर्ता निवडणुकीचा खर्च कसा काय उलचणार, असा प्रश्न शिंदे यांनी केला. निवडणूक लढविण्यासाठी विविध दाखले, ना हरकत प्रमाणपत्रे याची जमवाजमव केली हाेती. या कागदपत्रांची ३१ डिसेंबरच्या रात्री होळी करून निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट निर्णयाचा निषेध करणार असल्याचे कैलास शिंदे यांनी सांगितले.
उपशहर प्रमुखाचाही पत्ता कट
शिंदेसेनेचे उपशहरप्रमुख मनोज चौधरी हेही पॅनल क्रमांक १८ मधून इच्छुक होते. युतीच्या जागा वाटपात ही जागा भाजपच्या वाट्याला गेली. त्यामुळे चौधरी यांनी पदाचा राजीनामा पक्षाचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्याकडे दिला.