डोंबिवली हाणामारीप्रकरणी पाच अटकेत; शिंदेसेनेचीही भाजप कार्यकर्त्यांविरोधात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 06:29 IST2026-01-14T06:29:25+5:302026-01-14T06:29:58+5:30
डोंबिवली : येथील पॅनल क्रमांक २९ मध्ये भाजप-शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये सोमवारी (दि. १२) रात्री हाणामारी झाली होती. या प्रकरणी आठजणांविरोधात ...

डोंबिवली हाणामारीप्रकरणी पाच अटकेत; शिंदेसेनेचीही भाजप कार्यकर्त्यांविरोधात तक्रार
डोंबिवली : येथील पॅनल क्रमांक २९ मध्ये भाजप-शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये सोमवारी (दि. १२) रात्री हाणामारी झाली होती. या प्रकरणी आठजणांविरोधात रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी पाचजणांना अटक केली. हाणामारीत तीनजण जखमी झाले होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिंदेसेनेनेही भाजप कार्यकर्त्याच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
भाजपच्या उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर हे प्रचारानंतर घरी जात असताना, त्यांच्यावर लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. नाटेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिंदेसेनेचे उमेदवार नितीन पाटील, रवी पाटील, अनंत ठाकूर, रवी पुनसकर, प्रसाद घाग यांनी हल्ला केला. रामनगर पोलिस ठाण्यात आठजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शिंदेसेनेनेही भाजप कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल केली.
हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपने काढला मूक मोर्चा
ओमनाथ नाटेकर यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ भाजप पदाधिकारी, नागरिकांनी मंगळवारी मूकमोर्चा काढून आरोपींना अटक करण्याची मागणी केली. नाटेकर यांना खासगी इस्पितळात उपचारासाठी दाखल केले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. हल्ल्याच्या घटनेमुळे परिसरातील वातावरण तंग झाले होते.
पंकजा मुंडे यांच्याकडूनही हाणामारीचा निषेध
डोंबिवलीत भाजप-शिंदेसेनेत झालेल्या हाणामारीचा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मंगळवारी निषेध केला. त्या भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आल्या होत्या. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले.