"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 14:01 IST2025-12-29T13:59:37+5:302025-12-29T14:01:02+5:30
एक कट्टर कार्यकर्ता म्हणून सर्वगुण असताना राजकारणात निवडणुकीसाठी लागणारा आर्थिक सक्षम असणे हा महत्त्वाचा गुण माझ्याकडे नाही असं कैलास शिंदे यांनी म्हटलं आहे.

"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
कल्याण - महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरायला आता ४८ तास उरले आहेत. त्यात विविध पक्षातील इच्छुकांची तिकीट न मिळाल्याने नाराजी समोर येत आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतील माजी सभागृह नेते, गटनेते कैलास शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून माझी शिवसेना पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी केली आहे. आर्थिक सक्षम नसल्याचं कारण देत पक्षात निष्ठेला महत्त्व नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
या पत्रात कैलास शिंदे यांनी म्हटलंय की, सध्या देशात, राज्यात, जिल्ह्यात, शहरात आणि गावात ज्या प्रकारे राजकारण सुरू आहे त्यात हल्ली एकनिष्ठ असणे, किती कार्य केले, तुमचा अनुभव, शिक्षण यांना शून्य महत्त्व असून तुम्ही आर्थिक किती मजबूत आहात याला महत्त्व आहे. तुमच्याकडे फक्त पैसा असेल तरच तुम्ही निवडणूक लढवण्यास पात्र आहात असा अधोरेखित नियम झाला आहे असं म्हटलं.
त्यामुळे गुरूवर्य धर्मवीर आनंद दिघे आणि गुरुबंधू एकनाथ शिंदे यांना एक कट्टर कार्यकर्ता म्हणून सर्वगुण असताना राजकारणात निवडणुकीसाठी लागणारा आर्थिक सक्षम असणे हा महत्त्वाचा गुण माझ्याकडे नाही. त्यामुळे मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत तिकीट मिळणेस पात्र नाही. माझ्यामुळे पक्षाचे नुकसान होऊ नये म्हणून माझी पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी कैलास शिंदे यांनी पत्रातून केली आहे.
दरम्यान, दिघे साहेबांचा आणि एकनाथ शिंदे यांचा शिष्य म्हणून त्यांना अपेक्षित असा निष्ठावान २४ तास गोरगरिबांकरता कार्य करणारा आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारा, अनुभवी आणि सुशिक्षित २० वर्ष लोकांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याची पक्षाला गरज नसल्याची भावना व्यक्त करत कैलास शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले आहे. कैलास शिंदे हे प्रभाग क्रमांक ६१ कचोरे गावातील नगरसेवक होते, शिवसेनेचे माजी सभागृह नेते, गटनेते अशी पदे त्यांनी सांभाळली आहेत.