डोंबिवलीत युती असतानाही परस्परविरोधात लढती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 12:20 IST2026-01-08T12:20:14+5:302026-01-08T12:20:52+5:30
भाजप-शिंदेसेनेची युती असताना होणाऱ्या या परस्पर विरोधातील लढतीकडे दोन्ही पक्षाच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे...

डोंबिवलीत युती असतानाही परस्परविरोधात लढती!
डोंबिवली : महापालिका निवडणुकीमध्ये पॅनल क्र. २९ व २५ या दोन्ही ठिकाणी भाजपला बिग फाईटला सामोरे जावे लागणार आहे. पॅनल २९ मध्ये माजी नगरसेवक नितीन पाटील, रवींद्र पाटील, रंजना पाटील, रुपाली पाटील या शिंदेसेनेच्या पॅनल विरुद्ध भाजपचे मंदार टावरे, आर्या नाटेकर, अलका म्हात्रे, मनीषा म्हात्रे हे उमेदवार आहेत. भाजप-शिंदेसेनेची युती असताना होणाऱ्या या परस्पर विरोधातील लढतीकडे दोन्ही पक्षाच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे.
तसेच पॅनल २५ मध्ये मनसेने ऐनवेळी माजी नगरसेवक शैलेश धात्रक, मनीषा धात्रक आणि पूजा धात्रक यांना उमेदवारी दिली. धात्रक दाम्पत्य आधी भाजपचे नगरसेवक होते. आता त्या पॅनलमध्ये भाजपने माजी नगरसेवक नंदू म्हात्रे, समीर चिटणीस, मृदुला नाख्ये यांना उमेदवारी दिली आहे. त्या पॅनलमध्ये उद्धव सेनेने त्यांचे दोन उमेदवार उभे केले आहेत. शिंदेसेना, भाजप, मनसेच्या दृष्टीने त्या ठिकाणी 'बिग फाईट' मानली जात आहे. या सर्व उमेदवारांनी प्रचारात स्वतःला सिद्ध करण्यासाठी कंबर कसली आहे. काहींचे आधीचे अनुभव, विकास कामे तर काहींचे नवे चेहरे, नव्याने नियोजन, पक्षाची अदलाबदल, प्रभागाची अदलाबदल असे प्रचारामध्ये मुद्दे असल्याचे दिसून येत आहे. डोंबिवलीतील काही प्रभागांत बिनविरोध उमेदवार विजयी झाल्याने काही लढती सोप्या झाल्या आहेत.