अंबरनाथ, बदलापूरमध्ये स्वीकृत नगरसेवकपदावरून वादाची ठिणगी; शिंदेसेनेचे पारडे झाले जड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 06:24 IST2026-01-14T06:24:26+5:302026-01-14T06:24:48+5:30
नगरविकास विभागाचा अभिप्राय शिंदेसेनेच्या पथ्यावर; भाजपला फटका

अंबरनाथ, बदलापूरमध्ये स्वीकृत नगरसेवकपदावरून वादाची ठिणगी; शिंदेसेनेचे पारडे झाले जड
अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपालिकांतील स्वीकृत नगरसेवकपदाच्या नियुक्तीवरून वाद निर्माण झाला आहे. शिंदेसेनेकडील नगरविकास विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या अभिप्रायानुसार, जे पक्ष एकत्रित येऊन गट स्थापन करीत आहेत त्या गटाच्या नगरसेवकांच्या संख्येनुसार स्वीकृतपदाची वाटणी न करता निवडून आलेल्या पक्षांच्या सदस्य संख्येनुसार करण्यात यावी. या अभिप्रायामुळे स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीबाबत शिंदेसेनेचे पारडे जड झाले. त्यामुळे भाजपच्या नगराध्यक्षांनी घोषित केलेल्या नियुक्तीला स्थगिती मिळण्याची शक्यता आहे.
अंबरनाथ नगरपालिकेत भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी (अजित पवार) ने एकत्र येऊन नोंदणी केलेल्या गटाकडे ३२ जागा व बहुमत होते. मात्र, त्या आघाडीतून राष्ट्रवादी (अजित पवार) बाहेर पडली व त्यांच्या चार सदस्यांनी शिंदेसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला; परंतु या नगरपालिकेत सर्वाधिक २८ नगरसेवक शिंदेसेनेचे निवडून आले आहेत. त्यामुळे या सदस्यसंख्येवर त्यांनी स्वीकृत सदस्य निवडले.
भाजप-शिंदेसेनेने आपल्या वाट्याला दिली ३ पदे
नगरविकास विभागाच्या आदेशानुसार सर्वाधिक स्वीकृत सदस्यपदांवर शिंदेसेनेचा दावा मजबूत होतो. त्यामुळे पक्षाच्या सदस्यसंख्येवर की नोंदणी केलेल्या गटाच्या संख्याबळावर स्वीकृत सदस्यांचा कोटा ठरणार, असा पेच निर्माण झाला. सोमवारी झालेल्या बैठकीत भाजपच्या वाट्याला तीन, तर शिंदेसेनेला दोन स्वीकृत सदस्यपदे भाजपने मंजूर केलेल्या ठरावानुसार निश्चित केली तर शिंदेसेनेने मंजूर केलेल्या ठरावानुसार शिंदेसेनेला तीन, तर भाजपला दोन स्वीकृत सदस्यपदे मंजूर केली.
अधिकृत कोण?
स्वीकृत नगरसेवकपदाची नेमणूक ही नोंदणी केलेल्या गटाच्या एकूण नगरसेवकांच्या संख्येनुसार ठरते. अंबरनाथ विकास आघाडीचा गट सर्वप्रथम नोंदणीकृत करून त्यांची संख्या ३२ दर्शवण्यात आली. त्यानंतर लागलीच दोन दिवसांनंतर पुन्हा नवीन गट स्थापन करून त्या गटाकडे ३२ नगरसेवकांचे संख्याबळ असल्याचा दावा केला गेला. त्यामुळे कोणता गट अधिकृत हे निश्चित होत नाही. दरम्यान, नियमांच्या सुस्पष्टतेकरिता नगरविकास विभागाकडे अभिप्राय मागवला.
अंबरनाथमध्येही तेच
नगरविकास विभागाच्या अभिप्रायानुसार, जे पक्ष एकत्रित येऊन गट स्थापन करतील त्या गटाच्या नगरसेवकांच्या संख्येनुसार स्वीकृत नगरसेवकपदाची वाटणी न होता निवडून आलेल्या पक्षांच्या सदस्यसंख्येनुसार हे पद देण्यात यावे. त्यामुळे गटाच्या नोंदणीतील सदस्यसंख्या गृहीत धरावी की, सदस्यसंख्येनुसार स्वीकृत नगरसेवकपद द्यावे या मुद्द्यावर आता वाद निर्माण झाला आहे. अंबरनाथप्रमाणेच बदलापुरात देखील दोन पक्षांनी एकत्रित येऊन गट स्थापन केला होता. त्यामुळे त्या ठिकाणी देखील अशाच पद्धतीने गोंधळ उडाला आहे.