डोंबिवलीत निवडणुकीला हिंसक वळण! भाजप उमेदवाराचे पती गंभीर जखमी; कार्यकर्त्यांमध्ये रात्रभर राडा
By मुरलीधर भवार | Updated: January 13, 2026 06:51 IST2026-01-13T06:21:11+5:302026-01-13T06:51:40+5:30
भाजपा उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर यांना गंभीर दुखापत

डोंबिवलीत निवडणुकीला हिंसक वळण! भाजप उमेदवाराचे पती गंभीर जखमी; कार्यकर्त्यांमध्ये रात्रभर राडा
डोंबिवली :कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिंदे सेना युतीमध्ये निवडणूक लढत आहे. मात्र डोंबिवलीतील पॅनल क्रमांक २९ मध्ये युती नाही. कारण या पॅनलमध्ये भाजपच्या चार उमेदवारांसमोर शिंदे सेनेचे चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत. रविवारी भाजप कार्यकर्ते पैसे वाटप करीत असल्याचा आरोप शिंदे सेनेच्या उमेदवाराने केला होता.
भाजप कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना रंगेहात पकडल्याचा आरोप देखील केला आला. या कारणावरून जोरदार राडा झाला. त्यानंतर सोमवारी रात्री डोंबिवली पूर्व येथील तुकारामनगरमध्ये भाजप आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते आपापसात भिडले. भाजप कार्यकर्त्यांवर पैसे वाटप करीत असल्याचे आरोप करत शिंदे सेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि इतर कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. या दरम्यान जोरदार राडा झाला. भाजपा उमेदवार पप्पू म्हात्रे आणि भाजपा उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओम नाथ नाटेकर जखमी झाले आहेत. इतकेच नाही तर शिंदे सेनेचे उमेदवार रवी पाटील देखील जखमी झाले असल्याची माहिती आहे.
ओमनाथ नाटेकर यांना डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र शिंदे सेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हा प्रकार समोर आल्यानंतर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीला हिंसक वळण लागले आहे.
२९ अ मधून भाजपच्या कविता म्हात्रे यांच्या विरोधात शिंदे सेनेच्या रुपाली म्हात्रे, ब मधून भाजपच्या आर्या नाटेकर यांच्या विरोधात शिंदे सेनेच्या रंजना पाटील, क मधून भाजपचे मंदार टावरे यांच्या विरोेधात शिंदे सेनेचे नितीन पाटील हे उमेदवार आहे. ड मधून भाजपच्या अलका म्हात्रे यांच्या विराेधात शिंदे सेनेचे रवी पाटील उभे ठाकले आहे.