भाजप-शिंदेसेना युती ३० डिसेंबरला तुटणार? मनसे नेते राजू पाटील यांचे भाकीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 09:33 IST2025-12-27T09:33:14+5:302025-12-27T09:33:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण-डोंबिवली महाविकास आघाडीचे १२२ जागांचे वाटप निश्चित झाले असून, त्यापैकी ५४ जागा मनसे लढविणार ...

भाजप-शिंदेसेना युती ३० डिसेंबरला तुटणार? मनसे नेते राजू पाटील यांचे भाकीत
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण-डोंबिवली महाविकास आघाडीचे १२२ जागांचे वाटप निश्चित झाले असून, त्यापैकी ५४ जागा मनसे लढविणार आहे. उर्वरित जागा उद्धवसेना, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि काँग्रेस लढविणार आहे. उर्वरित जागांमध्ये उद्धवसेनेने त्यांच्या कोट्यातून राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जागा द्यायच्या आहेत. येत्या दोन दिवसांत मनसे आपले उमेदवार जाहीर करेल, अशी माहिती मनसेेचे नेते राजू पाटील यांनी दिली. भाजप-शिंदेसेना युती ३० डिसेंबरला तुटणार आहे, असे भाकीत त्यांनी केले.
महाविकास आघाडीतील जागावाटपात आपल्याला विश्वासात घेतले नाही या काँग्रेसच्या तक्रारीकडे लक्ष वेधले असता पाटील म्हणाले की, जागावाटपाच्या बैठकीला काँग्रेसचे नेते उपस्थित होते. भाजपला फायदा होईल, अशी भूमिका काँग्रेसचे नेते घेणार नाही. २७ गावांच्या सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने गुरुवारी बैठक घेऊन केडीएमसी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घेतलेली भूमिका रास्त असल्याचे पाटील म्हणाले. तसेच नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात आलेले नाही. या सगळ्यांचे पडसाद केडीएमसी निवडणुकीत उमटणार आहेत, असे पाटील म्हणाले.
ते निवडणुकीपूर्वी भांडत राहतात...
भाजप-शिंदेसेना निवडणुकीपूर्वी भांडत राहतात. निवडून आल्यावर एकत्रित येतात. यावेळी २९ डिसेंबरपर्यंत यांच्या दोघांमध्ये भांडण सुरू राहील व ३० डिसेंबरला त्यांची युती तुटणार असल्याचे ते म्हणाले.