आजी-माजी आमदारांच्या निकटवर्तीयांमुळेच बिग फाइट! अनेक माजी नगरसेवक आमने-सामने
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 12:35 IST2026-01-08T12:34:48+5:302026-01-08T12:35:25+5:30
२० जागांवर भाजप, शिंदेसेनेचे उमेदवार बिनविरोध...

आजी-माजी आमदारांच्या निकटवर्तीयांमुळेच बिग फाइट! अनेक माजी नगरसेवक आमने-सामने
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत १२२ जागांपैकी २० जागांवर भाजप आणि शिंदेसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने बिग फाइटची संख्या कमी झाली असली तरी काही प्रभागांत बिग फाइट होणारच आहे. त्याठिकाणी मातब्बर नगरसेवकांचे भवितव्य पणाला लागले आहे.
प्रभाग क्र. १ मध्ये शिंदेसेनेचे आ. विश्वनाथ भोईर यांचे भाऊ प्रभूनाथ भोईर यांच्या पत्नी सुप्रिया भोईर या रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात मनसे आणि उद्धवसेनेचे उमेदवार उभे आहेत. ठाकरेबंधूंची युती असली तरी दोघांचे उमेदवार रिंगणात कायम आहेत. या प्रभागातून आमदारांचे भाऊ जयवंत भोईर हेही निवडणूक रिंगणात आहेत. त्याच्या विरोधात मनसेचे सचिन शिंदे आणि उद्धवसनेचे नीलेश भोर उभे आहेत. त्यामुळे दोन जागांवर आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपचे वरुण पाटील हे दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात आहेत. ते माजी खा. कपिल पाटील यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांच्या विरोधात उद्धवसेनेचे भरतकुमार वायले उभे ठाकले आहेत. शिंदेसेनेच्या शालिनी वायले दुसऱ्यांदा निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या विरोधात उद्धवसेनेच्या राजश्री तिकुडवे उभ्या आहेत.
प्रभाग २ मधून भाजपचे दया गायकवाड यांची लढत उद्धवसेनेचे विक्रांत गायकवाड यांच्यासोबत आहे. माजी महापौर दिवंगत राजेंद्र देवळेकर यांच्या पत्नी अनघा देवळेकर उभ्या आहेत. त्यांच्या विरोधात शिंदेसेनेच्या सीताबाई नाईक उमेदवार आहेत. या प्रभागातून शिंदेसेनेचे गणेश कोट रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर उभे आहेत. प्रभाग ४ मधून शिंदेसेनेचे मयूर पाटील यांची लढत उद्धवसेनेचे राहुल कोट यांच्याशी आहे.
भाजपच्या माजी आमदाराची प्रतिष्ठा लागली पणाला
प्रभाग ७ मधून शिंदेसेनेचे मोहन उगले यांनी माघार घेतली आहे. या प्रभागातून विजया पोटे शिंदेसेनेकडून लढत आहे. याच प्रभागातून भाजपचे माजी आ. नरेंद्र पवार यांच्या पत्नी हेमलता पवार निवडणूक रिंगणात आहेत. भाजपच्या माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
प्रभाग ११ मधून शिंदेोनेचे शहरप्रमुख नीलेश शिंदे यांच्यासह मातब्बर नगरसेवक मल्लेश शेट्टी यांचे चिरंजीव हरमेश शेट्टी आणि भाजपच्या आ. सुलभा गायकवाड यांच्या जाऊबाई मनीषा गायकवाड या निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे या प्रभागाकडे जास्त लक्ष आहे. प्रभाग १८ मधून मातब्बर माजी नगसेवक मल्लेश शेट्टी, नवीन गवळी हे निवडणूक रिंगणात आहेत. त्यांची लढत उद्धवसेना आणि मनसेशी आहे. या प्रभागातून भाजपच्या रेखा चाैधरी या बिनविराेध निवडून आल्याने याठिकाणी महायुतीची एक जागा सेफ झाली.
शिंदेसेना, उद्धवसेना यांच्यामध्ये होणार लढत -
मयूर पाटील यांची पत्नी नमिता पाटील या शिंदेसेनेकडून निवडणूक रिंगणात आहेत. त्यांची लढत उद्धवसेनेच्या रूपा शेट्टी यांच्यासोबत आहे. प्रभागातून शिंदेसेनेचे संजय पाटील यांची लढत उद्धवसेनेचे उमेश बोरगावकर यांच्यासोबत आहे. याच प्रभागातून माजी महापौर वैजयंती घोलप यांची लढत उद्धवसेनेच्या अर्पणा भोईर यांच्यासोबत आहे. शिंदेसेनेच्या कस्तुरी देसाई यांची लढत स्वप्नाली केणे यांच्यासोबत आहे. शिंदेसेनेच्या नीलिमा पाटील यांची लढत उद्धवसेनेचे संकेश भोईर यांच्यासोबत आहे. माजी महापौर या प्रभागातून रिंगणात असल्याने या ठिकाणी चुरशीची लढत आहे.