शिरपूर, पिंपळनेरला भाजपचे उपनगराध्यक्ष; दोन्ही ठिकाणी स्वीकृत सदस्यांची बिनविरोध निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 14:40 IST2026-01-09T14:40:24+5:302026-01-09T14:40:24+5:30
पिंपळनेरला योगेश नेरकर तर शिरपूर उपनगराध्यक्षपदी संगीता देवरेंची निवड

शिरपूर, पिंपळनेरला भाजपचे उपनगराध्यक्ष; दोन्ही ठिकाणी स्वीकृत सदस्यांची बिनविरोध निवड
पिंपळनेर: पिंपळनेर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदासाठी झालेली निवडणूक नाट्यमय आणि चुरशीची ठरली. या अटीतटीच्या लढतीत भाजपाचे योगेश सोमनाथ नेरकर यांनी बाजी मारली आहे.
दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडल्याने निर्माण झालेला पेच नगराध्यक्षांच्या 'निर्णायक मताने' सुटला आणि भाजपचा विजय सुकर झाला. याचवेळी स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपकडून दयानंद कोतकर आणि शिंदेसेनेचे संभाजीराव अहिरराव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
विजयानंतर जल्लोष...
शिरपूर आणि पिंपळनेर येथे उपाध्यक्ष व स्विकृत नगरसेवकांची निवड झाल्यानंतर पक्षाच्या नेत्यांकडून निवड झालेल्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर विजयाचा जल्लोष करण्यात आला.
पोलिस बंदोबस्त
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नगराध्यक्षा डॉ. योगिता चौरे यांनी काम पाहिले, तर त्यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दीपक पाटील यांनी सहकार्य केले.
नगरपरिषद परिसराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.
यावेळी अॅड. ज्ञानेश्वर एखंडे, प्रशांत चौथरी, भिकुवाई मालूसरे, कौसर याकुब खान, विशाल सोनवणे, शोभा नेरकर, गणेश खैरनार आणि रेखा सूर्यवंशी, विनोद कोठावदे, योगेश नेरकर, सतीश शिरसाठ, माया पवार, प्रज्ञा बाविस्कर, आशा महाजन, मनीषा ढोले, लीलाबाई राऊत उपस्थित होते.
मतदानाचे गणित आणि नाट्यमय चुरस
निवडणूक प्रक्रियेत अर्ज भरण्यात आले. भाजपच्या वतीने योगेश नेरकर, तर शिंदे सेना पुरस्कृत अपक्ष नगरसेवक विजय गांगुर्डे यांनी अर्ज दाखल केल्याने लढत थेट झाली. दरम्यान निवडीनंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुलाची उधळण केली.
शिरपूरला माजी नगराध्यक्षांना मिळाली पुन्हा संधी
शिरपूर नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाने आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष संगीता राजेंद्र देवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीसोबतच ॐ स्वीकृत नगरसेवकांचीही नियुक्ती करण्यात आली, ज्यात सत्ताधारी भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) लाही संधी देण्यात आली आहे.
शिरपूर नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासह ३२ पैकी ३१ जागा जिंकून भाजपने एकहाती सत्ता मिळवलेली आहे. दिनांक ८ रोजी सकाळी ११ वाजता नगरपालिकेच्या सभागृहात नगराध्यक्ष चिंतनभाई अमरीशभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली
वेळी नगरपालिकेचे सभागृहनेते तथा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, मुख्याधिकारी (CEO) प्रशांत सरोदे, संजय हसवानी यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवड जाहीर होताच नूतन उपनगराध्यक्ष संगीता देवरे आणि स्वीकृत नगरसेवकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. आमदार अमरीशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहराच्या विकासाचा रथ अधिक वेगाने पुढे नेण्याचा विश्वास यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
स्वीकृत नगरसेवकपदी कोणाची वर्णी ?
नगरपालिकेच्या विकास प्रक्रियेत अनुभवी व्यक्तींचा सहभाग असावा या उद्देशाने तीन स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली प्रशांत बबनराव चौधरी (भाजप): भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचे चिरंजीव म्हणून त्यांsची निवड करण्यात आली आहे. यावेळी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माधवराव तुकाराम पाटील (भाजप): नगरपालिकेचे निवृत्त प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांचा अनुभव शहराच्या विकासासाठी कामी येणार आहे.
डॉ. अमृता महाजन (राष्ट्रवादी अजित पवार गट): महायुतीचा धर्म पाळत एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला देण्यात आली असून, डॉ. अमृता महाजन यांची या पदावर वर्णी लागली आहे.