संकटमोचकांची स्वकीयाशीच लढत; सलग सहा विजयानंतर गिरीश महाजन पुन्हा निवडणुकीला सामोरे
By चुडामण.बोरसे | Updated: October 31, 2024 13:51 IST2024-10-31T13:49:23+5:302024-10-31T13:51:39+5:30
महाजन यांची राज्यात पक्षाचे संकटमोचक अशी ओळख आहे.

संकटमोचकांची स्वकीयाशीच लढत; सलग सहा विजयानंतर गिरीश महाजन पुन्हा निवडणुकीला सामोरे
जळगाव : जामनेर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे नेते, ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन सातव्यांदा निवडणूक लढवित आहेत. यंदा महाविकास आघाडीने त्यांच्याविरोधात पारंपरिक विरोधकांना बाजूला सारुन भाजपमधून राष्ट्रवादी (शरद पवार गट) आलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांना उमेदवारी दिली आहे.
महाजन यांची राज्यात पक्षाचे संकटमोचक अशी ओळख आहे. सन १९९५ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार ईश्वरलाल जैन यांचा पराभव केला. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर ईश्वरलाल जैन यांचा दुसऱ्यांदा तर याशिवाय संजय गरुड, माजी नगराध्यक्ष राजू बोहरा, डिगंबर पाटील यांचा पराभव करीत महाजन विजयाची डबल हॅटट्रीक साजरी करून आता सातव्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत.
विरोधकांना भाजपमध्ये घेण्याची खेळी
- गिरीश महाजन यांनी यावेळी वेगळी खेळी खेळली. त्यांनी आपल्याकडे विरोधकांना भाजपमध्ये घेत विरोधी पक्ष कमकुवत करण्याचा प्रयत्न केला.
- गेल्यावेळी त्यांच्या विरोधात निवडणूक लढलेले संजय गरूड हे आता राष्ट्रवादीऐवजी भाजपमध्ये आहेत. असे असताना ज्यांना एकेकाळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनवले त्या दिलीप खोडपे यांनी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीत (शरद पवार गट) प्रवेश केला आणि महाजनांविरोधात उमेदवारीही मिळवली आहे. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे
लक्ष आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
- विविध खात्याचे मंत्री म्हणून महाजन यांनी मतदारसंघात भरीव निधी आणला.
- शेतीमालाला भाव, औद्योगिक विकास या मुद्यांचा विरोधकांकडून वापर केला जात आहे. तर
- याउलट ३० वर्षात केलेल्या विकास कामांच्या बळावर सत्ताधारी प्रचार करीत आहे.
लोकसभेमध्ये काय घडले, परिणाम काय?
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रक्षा खडसे विजयी झाल्या. त्यांना जामनेर विधानसभा मतदारसंघात ३६ हजार मतांची आघाडी मिळाली होती.
२०१९ मध्ये काय घडले ?
गिरीश महाजन (विजयी) १,१४,७१४
संजय गरुड राष्ट्रवादी ७९,७००
भीमराव चव्हाण वंचित बहुजन आघाडी ६,४७१
नोटा - २,१०५
२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी?
वर्ष विजयी उमेदवार पक्ष मते
२०१४ गिरीश महाजन भाजप १०३४९८
२००९ गिरीश महाजन भाजप ८९०४०
२००४ गिरीश महाजन भाजप ७१८१३
१९९९ गिरीश महाजन भाजप ५६४१६