२०हून अधिक उमेदवार 'कोट्यधीश'; भाजपच्या दीपमाला काळे सर्वाधिक श्रीमंत उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 14:15 IST2026-01-06T14:07:14+5:302026-01-06T14:15:37+5:30
उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून मालमत्तेचे तपशील समोर

२०हून अधिक उमेदवार 'कोट्यधीश'; भाजपच्या दीपमाला काळे सर्वाधिक श्रीमंत उमेदवार
सुनील पाटील
जळगाव : महापालिकेच्या मैदानात उतरलेल्या ३२१ उमेदवारांपैकी २० उमेदवार कोट्यधीश आहेत, तर निम्म्याहून अधिक उमेदवार लखपती आहेत. उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेचे तपशील समोर आले आहेत. संपत्तीच्या शर्यतीत प्रभाग ७ अ मधील भाजपच्या उमेदवार दीपमाला मनोज काळे अव्वल आहेत. त्यांची एकूण मालमत्ता तब्बल ३० कोटी ३० लाख रुपये इतकी आहे. त्यांच्या पाठोपाठ भाजपच्याच शशीबाई ढंढोरे (११.३२ कोटी) आणि प्रकाश बालाणी (११.१६ कोटी) यांचा क्रमांक लागतो.
महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असून, प्रचाराचा धुरळा खऱ्या अर्थाने उड्डू लागला आहे. मात्र, मतदानाच्या प्रत्यक्ष प्रक्रियेआधीच महायुतीने (भाजप आणि शिंदेसेना) मोठी आघाडी घेतली आहे. भाजपचे ६ आणि शिंदेसेनेचे ६, अशा एकूण १२ उमेदवारांनी बिनविरोध निवडून येत विजयाचे खाते उघडले आहे.
कर्जाचा डोंगरही मोठा
केवळ मालमत्ताच नाही, तर अनेक श्रीमंत उमेदवारांवर कर्जाचा बोजाही मोठा आहे. सर्वाधिक श्रीमंत दीपमाला काळे यांच्यावर ७कोटी ७९ लाखांचे कर्ज आहे तर ३,५८,२०,००० विष्णू भंगाळे आणि सागर सोनवणे यांच्यावरही प्रत्येकी ३ कोटींहून अधिक कर्ज आहे.
आरोपांच्या फैरी आणि निवडणुकीचा खर्च
बिनविरोध निवडीमुळे विरोधकांनी महायुतीवर पैशाचा बाजार मांडल्याचा आणि मतदारांचा हक्क हिरावल्याचा आरोप केला आहे. मात्र, निवडणूक खर्चाचा विचार करूनच पक्षांनी सक्षम उमेदवारांना संधी दिली आहे, असा बचाव सत्ताधारी पक्षांकडून केला जात आहे.
कार, सोने आणि बरेच काही
या कोट्यधीश व लखपती उमेदवारांकडे कार, दुचाकी व सोने आहे. सागर सोनवणे यांच्याकडे बुलेट, डंपर, ट्रॅक्टर आदी वाहनेही आहेत. २४ ग्रॅम सोनेदेखील आहे. रोख रक्कम एक ते दहा लाखांपर्यंत आहे. बहुतांश जणांकडे शेती आहे. त्यांनी शेती हाच व्यवसाय दाखविला आहे. बहुतांश जणांची शेती जळगाव तालुक्यातील गावांमध्येच आहे
सहा प्रभागांची माहिती संकेतस्थळावर नाही
प्रत्येक उमेदवाराने आपली संपत्ती शपथपत्रातून जाहीर केलेली आहे. ही माहिती महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली असली तरी १९ पैकी ८, ९, १०, १३, १८ व १९ या सहा प्रभागांतून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध नाही, त्यामुळे या प्रभागात कोणता उमेदवार श्रीमंत आहे हे कळू शकले नाही.
१.दीपमाला मनोज काळे,भाजप ३०,३०,४३,७४२
२.शशीबाई शिवचरण ढंढोरे,भाजप ११,३२,२९,४४५
३.प्रकाश रावलमल बालानी,भाजप ११,१६,७२,५८५
४.नितीन बालमुकुंद लड्ढा,भाजप १०,३५,१३,५७८
५.रेश्मा कुंदन काळे,शिंदेसेना ९,९०,४६,८००
६.विष्णू रामदास भंगाळे,शिंदेसेना ७,३२,६३,८२६
७.सागर श्यामकांत सोनवणे,शिंदेसेना ६,१०,३३,१९६
८.विशाल सुरेश भोळे,भाजप ५,८५,९२,९२५
९.अमित पांडुरंग काळे,भाजप ५,६८,२७,५५६
१०.सुनील वामनराव खडके,भाजप ३,५८,२०,०००
११.अमृता चंद्रकांत सोनवणे,शिंदेसेना २,२७,४६,६२६
१२.सुरेखा नितीन तायडे,भाजप १,९१,५२,९४०
१३.दीपक सूर्यवंशी,भाजप १,८७,३१,१५१
१४.संतोष मोतीराम पाटील,उद्धवसेना १,७७,८४,९९४
१५.अरविंद भगवान देशमुख,भाजप १,५६,५२,५३४
१६.अॅड. शुचिता अतुलसिंह हाडा भाजप १,४७,४०,०११
१७.गायत्री इंद्रजित राणे,भाजप १,२५,७०,०००