जळगावमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराची माघार अन् शिंदेसेनेचं खातं उघडलं! आमदार पुत्र गौरव सोनवणे बिनविरोध
By अजय पाटील | Updated: January 1, 2026 13:57 IST2026-01-01T13:55:04+5:302026-01-01T13:57:33+5:30
अर्ज छाननी प्रक्रियेनंतर अर्ज मागे घेण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी असून, पहिल्याच दिवशी अनेक ठिकाणी अर्ज मागे घेण्यात आले आहेत. जळगावमध्ये याचा शिंदेसेनेला फायदा झाल आहे.

जळगावमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराची माघार अन् शिंदेसेनेचं खातं उघडलं! आमदार पुत्र गौरव सोनवणे बिनविरोध
-अजय पाटील, जळगाव
जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी माघारीची प्रक्रिया सुरु झाली असून, ३१ डिसेंबर रोजी छाननी प्रक्रियेदरम्यान प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अर्ज बाद झाला. त्यामुळे भाजपाच्या उज्ज्वला बेंडाळे या बिनविरोध विजयी झाल्या. शिंदेसेनेनेही माघारीच्या पहिल्याच दिवशी आपलं खातं उघडलं आहे. शिंदेसेनेचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांचे पुत्र गौरव सोनवणे हे देखील बिनविरोध विजयी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
याबाबतची अधिकृत घोषणा अर्ज माघारी घेण्याचा कालावधी संपल्यानंतर होणार आहे. छाननीच्या दिवशी भाजपाच्या माजी महानगराध्यक्षा उज्ज्वला मोहन बेंडाळे यांच्या विरोधात एकही अर्ज नसल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यामुळे भाजपने महापालिकेत खाते उघडले होते.
प्रभाग १८ अ मधून गौरव सोनवणेंचा विजय
आता शिंदेसेनेनेही महापालिकेत धमाकेदार एंट्री केली आहे. प्रभाग क्रमांक १८-अ मधून गौरव चंद्रकांत सोनवणे यांना शिंदेसेनेने उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात उद्धवसेनेचे मयूर चंद्रशेखर सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
बुधवारपासून (१ जानेवारी) अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्याच दिवशी उद्धवसेनेच्या मयूर चंद्रशेखर सोनवणे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यामुळे गौरव चंद्रकांत सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या माध्यमातून महापालिकेत शिंदेसेनेने देखील आपले खाते उघडले आहे.