'मतदान कोणी केले?'; पुण्यातून मतदानासाठी आलेल्या तरुणाच्या नावावर अंबडमध्ये बोगस मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 17:54 IST2025-12-02T17:51:51+5:302025-12-02T17:54:00+5:30
पुण्यातून खास मतदानासाठी आलेल्या तरुणाच्या हक्कावर डल्ला; अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप

'मतदान कोणी केले?'; पुण्यातून मतदानासाठी आलेल्या तरुणाच्या नावावर अंबडमध्ये बोगस मत
जालना/अंबड: लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी, आपला पहिला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दूर पुण्यातून आलेल्या एका उत्साही तरुणाचा आज चांगलाच भ्रमनिरास झाला. जालन्याच्या अंबड नगरपरिषद निवडणुकीत हा धक्कादायक प्रकार समोर आला, जिथे आनंद बळिराम शिंदे मतदान केंद्रावर पोहोचण्यापूर्वीच त्याच्या नावावर दुसऱ्याच व्यक्तीने मतदान केले असल्याचे उघड झाले.
पुण्याहून आला, पण हक्क बजावता आला नाही
अंबड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १ मधील बूथ क्रमांक ३ वर आनंद शिंदे मतदान करण्यासाठी पोहोचला. आनंद हा त्याचा पहिला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी पुण्याहून खास अंबडला आला होता. मतदान केंद्रावर तो पोहोचला असता, त्याच्या नावावर दुसऱ्या व्यक्तीने मतदान केल्याची नोंद दिसताच तो संतापला आणि पूर्णपणे निराश झाला. बोगस मतदानाच्या या प्रकारामुळे आनंद शिंदे याला मतदानाचा हक्क न बजावता माघारी फिरावे लागले.
लोकशाहीचा गळा घोटला
दरम्यान, "या प्रकाराची तक्रार केल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी गांभीर्याने पाहिले नाही, उलट तूच मतदान करून गेल्याचे सुनावले," असे आनंद शिंदे यांनी सांगितले. ज्या तरुणांमध्ये मतदानाबद्दल उत्साह आहे, अशा तरुणांचा हक्क अशाप्रकारे हिरावला जात असेल, तर लोकशाही प्रक्रिया किती सुरक्षित आहे, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. पहिल्यांदा मतदान करणाऱ्या आनंदचा उत्साह केवळ बोगस मतदानामुळे भंग झाला नाही, तर त्याच्या लोकशाहीवरील विश्वासालाही तडा गेला आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून बोगस मतदान करणाऱ्यांवर व त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.