आज प्रचार तोफा थंडावणार; 'अंधार' पडताच छुपा प्रचार, वैयक्तिक भेटी..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 15:01 IST2026-01-13T14:59:48+5:302026-01-13T15:01:07+5:30
१५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला लागणार निकाल

आज प्रचार तोफा थंडावणार; 'अंधार' पडताच छुपा प्रचार, वैयक्तिक भेटी..!
सोमनाथ खताळ/जालना : जालना महानगरपालिकेच्या पहिल्या ऐतिहासिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी सुरू असलेला प्रचाराचा धुरळा आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. १३ जानेवारी रोजी सायंकाळी प्रचाराच्या तोफा अधिकृतपणे थंडावणार आहेत. यामुळे उमेदवारांकडे आता केवळ काही तासांचाच अवधी शिल्लक राहिला असून, जाहीर सभा आणि रॅली संपल्यानंतर रात्रीच्या अंधारात 'घरोघरी' आऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर सर्वच उमेदवारांचा भर असणार आहे.
१६ प्रभागांतील ६५ जागांसाठी एकूण ४५४ उमेदवार रिंगणात आहेत. यात १५४ अपक्ष उमेदवारांचा मोठा भरणा असल्याने लढती चुरशीच्या झाल्या आहेत. ३ जानेवारीला चिन्हांचे वाटप झाल्यानंतर उमेदवारांना प्रत्यक्ष प्रचारासाठी केवळ १० दिवसांचा अवधी मिळाला, राजकीय पक्षांच्या उमेदवारांना त्यांच्या हक्काच्या चिन्हामुळे फारशी अडचण आली नाही, मात्र अपक्ष उमेद्वारांना मिळालेली 'शिट्टी', 'कपबशी', 'रिक्षा' किंवा 'बॅट' यांसारखी चिन्हे मतदारांच्या मनावर बिंबवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली आहे.
लोकशाहीचा उत्सव.. आता लक्ष 'गुप्त' रणनीतीकडे!
मंगळवारी जाहीर प्रचार संपल्यानंतर खऱ्या अर्थाने 'गुप्त' प्रचाराला सुरुवात होईल, १५ जानेवारीला मतदान होत असल्याने बुधवारचा पूर्ण दिवस हा छुप्या पद्धतीने मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी वापरला जाणार आहे. प्रलोभने, जातीची समीकरणे आणि वैयक्तिक नातेसंबंधांचा वापर करून मतदारांना साद घातली जाणार आहे.
६३ भाजपचे उमेदवार
या निवडणुकीत सर्वाधिक ६३ उमेदवार भाजपने मैदानात उतस्थले आहेत. त्यानंतर शिंदेसेना ६१, काँग्रेस ४३, राष्ट्रवादी (अजित पयार) ४०, वंचित बहुजन आघाडी, १७, एमआयएम १७, राष्ट्रवादी (शरद पवार) १३, उद्धवसेना १२ यांचा क्रमांक लागतो. १५४ अपक्ष उमेदवारांनी शड्डू ठोकल्यामुळे अनेक प्रभागांत तिरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे. १६ जानेवारीला निकाल लागणार आहे.
अपक्षांची 'चिन्ह' वारी अन् उमेदवारांची धावपळ
अपुऱ्या यंत्रणेमुळे आणि मर्यादित मनुष्यबळामुळे आपले चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवताना अपक्षांची मोठी दमछाक झाली आहे. पहिले पाच-सहा दिवस तर केवळ चिन्ह काय आहे, हे सांगण्यातच गेले. आता शेवटच्या काही तासांत ईव्हीएमवरील बटण क्रमांक मतदारांना समजावून सांगताना उमेदवारांची धावपळ होणार आहे.
प्रशासन म्हणून आम्ही पूर्ण तयारी केली आहे. गैरप्रकार होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. लोकशाहीच्या उत्सवाला कोणीही गालबोट लावू नये. काही चुकीचा प्रकार घडला तर कडक कारवाई केली जाईल. आशिमा मित्तल, जिल्हाधिकारी तथा आयुक्त मनपा, जालना
बॅनर हटणार, रस्ते मोकळा श्वास घेणार
निवडणूक प्रचाराचे शहरात लागलेले बॅनर्स आणि पोस्टर्स मंगळवारी सायंकाळनंतर हटवले जाणार आहेत. यामुळे जालन्यातील रस्ते आणि भिंती मोकळ्या होतील. दहा दिवसांच्या गदारोळानंतर शहराचा श्वास मोकळा होणार असून, नागरिकांना आता या 'बॅनरबाजी'तून सुटका मिळणार आहे.
प्रशासनाचे दोन दिवस कसरतीचे
मंगळवारची रात्र आणि बुधवारचा दिवस-रात्र प्रशासनासाठी कसरतीचे ठरणार आहेत. याच काळात पैसे वाटप, प्रलोभने आणि अफवा पसरण्याची दाट शक्यता असते. हे गैरप्रकार रोखण्यासाठी आणि शांतता राखण्यासाठी पुढील काही तास प्रशासन व पोलिसांच्या परीक्षेचे असून, त्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.