शिंदेसेना ६१ लढणार, ४० जिंकणार; मग उरलेल्या २१ उमेदवारांचे काय होणार? पक्षात अस्वस्थता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 15:40 IST2026-01-09T15:38:58+5:302026-01-09T15:40:00+5:30
अर्जुन खोतकरांच्या वक्तव्याने उमेदवारांत अस्वस्थता

शिंदेसेना ६१ लढणार, ४० जिंकणार; मग उरलेल्या २१ उमेदवारांचे काय होणार? पक्षात अस्वस्थता
जालना : जालना महानगर पालिकेच्या सत्ता आणण्यासाठी सध्या आकड्यांचे - राजकारण कमालीचे तापले आहे. शिंदेसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी प्रचाराचा नारळ फोडताना 'आमचे ४० नगरसेवक निवडून येतील,' असा दावा केला आहे. मात्र, महापालिकेची एकूण सदस्य संख्या ६५ असताना आणि शिंदेसेना स्वतः ६१ जागांवर नशीच आजमावत असताना, खोतकरांच्या या दाव्याने स्वपक्षातच मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, ४० जागा जिंकणार असतील तर मग उरलेल्या २१ जागांवर पराभव होण्याची शक्यता कशामळे आहे, हे खोतकर का सांगत नाहीत? असा सवालही उपस्थित होत आहे.
अंतर्गत नाराजी, बंडाची टांगती तलवार
शिंदेसेनेच्या या 'नंबर गेम'मुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये गटबाजीला उधाण आले आहे. 'निवडून येणारे ४०' आणि 'बळी जाणारे २१' अशा दोन अदृश्य गटांत पक्षाची विभागणी होताना दिसत आहे. ज्यांना आपण त्या २१ मध्ये आहोत, असे वाटत आहे, ते उमेदवार आता प्रचारात थंड पडण्याची शक्यता आहे. याचा फटका प्रत्यक्ष मतदानावर होण्याचीही दाट शक्यता आहे. होण्याऐवजी पक्षांतर्गत कलहच अधिक टोकदार केला आहे.
पराभूत उमेदवारांचे काय?
४० उमेदवार निवडून येणार असतील, तर उरलेल्या २१ उमेदवारांचा पराभव होणार हे निश्चित आहे. 'ते २१ दुर्दैवी उमेदवार कोण?' या प्रश्नावरून आता खुद्द शिंदेसेनेतच अस्वस्थता पसरली आहे. ज्या उमेदवारांना आपण निवडून येऊ असा ठाम विश्वास आहे, त्यांनाही आता या ४० च्या जादूई आकड्यात आपले स्थान नक्की कुठे आहे, याची चिंता सतावत आहे. यामुळे कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढण्याऐवजी, 'आपल्याच नेत्याला आपल्या विजयाची खात्री नाही का?' अशा संशयास्पद वातावरणाने शिंदेसेनेला ग्रासले आहे.
१६ जानेवारीला फैसला
खोतकरांचा हा आकडा केवळ मतदारांना भुरळ घालण्यासाठी आहे की कार्यकर्त्यांमधील मरगळ झटकण्यासाठी, हे लवकरच स्पष्ट होईल, १५ जानेवारीला मतदान पार पडल्यानंतर आणि १६ जानेवारीला जेव्हा मतमोजणी होईल. त्यानंतर खोतकरांचे ४० चे स्वप्न पूर्ण होते की २१ पराभूत उमेदवारांचा आकडा अधिकच वाढतो, हे स्पष्ट होणार आहे.