Jalna Dist Parishad Election Result 2025: अंबड, परतूरमध्ये भाजपचा बोलबाला, भोकरदनमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची बाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 16:43 IST2025-12-21T16:42:54+5:302025-12-21T16:43:32+5:30
अंबडमध्ये भाजपची सत्ता कायम राहिली असून, परतूर, भोकरदनमध्ये काँग्रेसला झटका बसला आहे.

Jalna Dist Parishad Election Result 2025: अंबड, परतूरमध्ये भाजपचा बोलबाला, भोकरदनमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची बाजी
जालना : अंबड, परतूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या महिला उमेदवार विराजमान झाल्या आहेत. भोकरदनमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवार विजयी झाल्या. अंबडमध्ये भाजपची सत्ता कायम राहिली असून, परतूर, भोकरदनमध्ये काँग्रेसला झटका बसला आहे.
भाजप आमदार नारायण कुचे यांनी अंबड नगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ता कायम ठेवण्यात यश मिळविले. येथे देवयानी कुलकर्णी नगराध्यक्ष झाल्या असून, भाजपचे १४ उमेदवार विजयी झाले आहेत. माजी मंत्री राजेश टोपे यांच्या गटाला झटका बसला आहे. येथे भाजपा- १४, राष्ट्रवादी अ.प. १, राष्ट्रवादी श.प. ४, काँग्रेस १, रासपाचे २ उमेदवार विजयी झाले आहेत.
भोकरदनमध्ये काँग्रेस सत्तेतून पायउतार झाली असून, भाजपचे माजी मंत्री रावसाहेब दानवे, आ. संतोष दानवे यांचीही जादू चालली नाही. येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या समरीन मिर्झा नगराध्यक्षा झाल्या असून, ९ उमेदवारही विजयी झाले. तर भाजपचे ०८, शिवसेना शिंदेगटाचा १, काँग्रेसचे २ उमेदवार विजयी झाले आहेत.
परतूरमध्ये भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमधील प्रियंका राक्षे नगराध्यक्षा झाल्या असून, ६ उमेदवारही विजयी झाले. तर राष्ट्रवादी श.प.चे ६, राष्ट्रवादी अ.प. ५, शिवसेना उबाठाचे ३, काँग्रेसचे ३ उमेदवार विजयी झाले आहेत.