Countdown of counting votes | मतमोजणीचे काऊंटडाऊन सुरू
मतमोजणीचे काऊंटडाऊन सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या २३ मे रोजी जाहीर होणार आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.
निवडणुकीच्या मतमोजणीसाठी ८०० कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी राजीव नंदकर यांनी दिली. दरम्यान या संदर्भात रविवारी येथील सेंटमेरी शाळेत दुसरे प्रशिक्षण पार पडले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बिनवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी मतमोजणीसाठीची तयारी आणि ती कशी करावी, या संदर्भात माहिती दिली.
यामध्ये एक सुपरवायझर, एक सहाय्यक आणि एक सूक्ष्म निरीक्षक असे एका टेबलमध्ये तीन कर्मचारी राहणार असून असे ८४ टेबल विधानसभानिहाय राहणार आहेत. पोस्टल बॅलेट मतांसाठी स्वतंत्र टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. तर पाच व्हीव्हीपॅटच्या मतांची मोजणी करण्यात येणार आहे.
एकूण जवळपास ८०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती मतमोजणीसाठी करण्यात आली आहे. या मतमोजणीसाठी ८४ टेबल मागे राजकीय पक्षांचे ८४ एजंटांना प्रवेश देण्यात येणार आहे. मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे.
निवडणूक निकालाच्या जवळपास २५ फे-या मतमोजणीच्या होतील अशी शक्यता रवींद्र बिनवडे यांनी व्यक्त केली. या प्रशिक्षण शिबीराला निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, उपविभागीय अधिकारी केशव नेटके यांची उपस्थिती होती.


Web Title: Countdown of counting votes
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.