जालन्यात ४४९ उमेदवार आखाड्यात; 'मविआ'ची मोट कायम, महायुतीतील मित्रपक्ष एकमेकांसमोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 19:14 IST2026-01-03T19:13:41+5:302026-01-03T19:14:51+5:30
जालन्यातील बहुतांश प्रभागांत चाैरंगी तर काही प्रभागांत बहुरंगी लढती होणार आहेत.

जालन्यात ४४९ उमेदवार आखाड्यात; 'मविआ'ची मोट कायम, महायुतीतील मित्रपक्ष एकमेकांसमोर
जालना : जालना महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी २ जानेवारी रोजी ४०७ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. महापालिकेतील ६५ जागांसाठी आता ४४९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. महायुतीतील भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादीने (अजित पवार) स्वतंत्र पॅनल उभा केले आहेत. तर 'मविआ'ची मोट कायम असून, वंचित आणि एमआयएमनेही उमेदवार दिले आहेत. त्यामुळे जालन्यातील बहुतांश प्रभागांत चाैरंगी तर काही प्रभागांत बहुरंगी लढती होणार आहेत.
जालना नगरपालिकेचे दोन वर्षांपूर्वी महानगरपालिकेत रूपांतर झाले असून, मनपाची प्रथमच निवडणूक होत आहे. ही निवडणूक महायुतीतील मित्रपक्षांनी एकत्र लढावी, यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत बैठका झाल्या. परंतु, ऐनवेळी स्वतंत्र निवडणुका लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादीने (अजित पवार) स्वतंत्र पॅनल उभा केले आहेत. राष्ट्रवादीने (अजित पवार) ५० उमेदवार उभा केले असून, ६ जागा लढविणाऱ्या मनसेला सोबत घेतले असून, इतर ठिकाणी उमेदवार पुरस्कृत केले जाणार आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीची मोट कायम आहे. काँग्रेस, उद्धवसेना आणि राष्ट्रवादीने (शरद पवार) एकत्रित ६५ उमेदवार निवडणूक रिंगणात उभा केले आहेत. काँग्रेसचे ४१ आणि इतर मित्रपक्षांचे प्रत्येकी १२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
वंचित, एमआयएम वाढविणार डोकेदुखी
जालन्यात महायुतीतील मित्रपक्ष स्वतंत्र लढत असून, मविआची मोट कायम आहे. त्यात वंचित बहुजन आघाडीने २२ आणि एमआयएमने १७ उमेदवार निवडणूक रिंगणात उभा केले आहेत. त्यामुळे प्रमुख पक्षांतील नेत्यांसह उमेदवारांचीही डोकेदुखी वाढणार आहे.