हिंगोलीच्या निकालाने आघाडीत अस्वस्थता; युतीत आत्मविश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 06:12 PM2019-05-25T18:12:53+5:302019-05-25T18:18:09+5:30

नाराजांना आपलेसे करण्यात आणि सर्वांनाच सोबत घेण्यात शिवसेनेच्या हेमंत पाटील यांना यश

shiv sena's hemant patil wins in Hingoli lok sabha election | हिंगोलीच्या निकालाने आघाडीत अस्वस्थता; युतीत आत्मविश्वास

हिंगोलीच्या निकालाने आघाडीत अस्वस्थता; युतीत आत्मविश्वास

Next
ठळक मुद्दे काँग्रेसच्या वानखेडेंना पक्षातील गटबाजीचा फटकाप्रचारात एकजीवपणा दिसला नाही

- विजय पाटील

हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या एकतर्फी निकालाने आघाडीतील नेत्यांमधील अस्वस्थता वाढली असून युतीच्या नेत्यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. गट-तट आणि मोठेपणाची भूक कधी संपणारच नसल्याने आत्मपरीक्षण करूनही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्याचे उत्तर सापडेल, अशी स्थिती नाही.

या लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूर्यकांता पाटील यांना यापूर्वी १९९९ मध्ये भारिप-बमसंचे माधवराव नाईक यांच्या झंझावातामुळे तिसऱ्या क्रमांकावर जावे लागले होते. यावेळी तिसऱ्या क्रमांकावर जाण्याइतपत बेहाल झाले नाहीत. मात्र वंचित आघाडी तगडी लढत देणार असल्याची चिन्हे निर्माण होताच अनेकांनी शिवसेनेला जवळ करण्यातच धन्यता मानली. शिवाय हेमंत पाटील यांनी पहिल्या दिवसापासून केवळ विजयासाठीच प्रयत्न केले. नाराजांना आपलेसे करण्यात कोणताच कमीपणा मानला नाही. आ.डॉ.जयप्रकाश मुंदडा, आ.नागेश पाटील आष्टीकर हे उमेदवारीचे दावेदारही जवळ केले. शिवाय आ.तान्हाजी मुटकुळे, माजी खा. सूर्यकांता पाटील, शिवाजी माने, माजी आ.गजानन घुगे, शिवाजी जाधव, संतोष बांगर आदींचा प्रचारासाठी खुबीने वापर केला. त्यामुळे प्रत्येकजण त्यांच्यासाठी झटून काम करीत होता. जातीय, सामाजिक गणितांच्या पलिकडची भूमिका ठेवून काम केले जात होते. मित्रपक्ष भाजप तर त्याही पुढे होता. त्यामुळे पाटील यांनी ५ लाख ८६ हजार ३१२ मतांचा आकडा गाठला.

दुसरीकडे काँग्रेसमध्ये मात्र अतिशय थंड वातावरण होते. त्यातही गटा-तटाची मजबूत तटबंदी उमेदवार सुभाष वानखेडे यांना पावलोपावली अडचणीत आणत होती. खा.राजीव सातव यांचा समर्थकवर्ग प्रत्येक विधानसभेत आहे. स्थानिक विधासभेत मागच्या वेळी पराभूत वा विजयी झालेल्यांचे वेगळे गट आहेत. आ.प्रदीप नाईक, आ.संतोष टारफे यांच्यासह माजी आ.जयप्रकाश दांडेगावकर, माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, माजी आ. विजय खडसे यांच्या प्रचारात एकजीवपणा नव्हता. पोटात एक अन् ओठात एक या भूमिकेत अनेकजण होते.

मानपानाची प्रत्येकाची अपेक्षा वानखेडे पूर्ण करू शकले नाहीत. कुणाबद्दल चांगले बोलले की, दुसऱ्या गटात नाराजी होत असल्याचा फटका त्यांना सोसावा लागत होता. ते अगदीच सूर हरवलेल्या फलंदाजासारखे लढत होते. शिवाय मराठा वोटींगलाच टार्गेट केल्याने इतरांकडे दुर्लक्ष झाले. किंबहुना गृहित धरलेल्या अनेक घटकांनी वंचित वा सेनेचा मार्ग पत्करला. त्यातच ‘लक्ष्मी’अस्त्राचा अभाव असल्यामुळे वानखेडे  ३ लाख ८ हजार ४५६ मतांमध्ये गुंडाळले गेले.

वंचित फॅक्टर
च्या निवडणुकीत वंचित आघाडी हा महत्त्वपूर्ण फॅक्टर ताकदीनिशी उदयास आला. मोहन राठोड हे तेवढे प्रभावी नेते कधीच नव्हते. मात्र दलित, बंजारा व पक्षाच्या इतर उमेदवारांच्या माध्यमातून सोशल इंजिनिअरिंगचा भाग म्हणून त्यांना मते मिळाल्याने १ लाख ७४ हजार ५१ हजारांवर पोहोचले. शिवाय त्यांची प्रचारयंत्रणाही होती, हे विशेष.  बहुदा अशा नवागतांकडे यंत्रणा अपुरी असल्याने फायदा होत नाही. याशिवाय २३ हजार मते घेणाऱ्या संदेश चव्हाण या अपक्ष उमेदवारानेही समाजाच्या मतांमध्ये आपले स्थान दाखवून दिले. 

स्कोअर बोर्ड
शिवसेनेचे विजयी उमेदवार हेमंत पाटील यांनी ५ लाख ८६ हजार ३१२ मतांचा आकडा गाठला. काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांना ३ लाख ८ हजार ४५६ मते पडली. उमरखेड-५६,३९१, किनवट-४३,८५५, हदगाव-४३१९५, वसमत-४८२२३, कळमनुरी-४३२७९, हिंगोली-४१४८९ असे विधानसभानिहाय मताधिक्याचे आकडे पाहून खुद्द युतीच्या नेत्यांचेही डोळे विस्फारले आहेत.

Web Title: shiv sena's hemant patil wins in Hingoli lok sabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.