पैठणमध्ये नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत; युती-आघाडी फिसकटल्याने सर्वांचीच प्रतिष्ठा पणाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 15:00 IST2025-11-22T14:57:07+5:302025-11-22T15:00:31+5:30
नगरपरिषद निवडणुकीसाठी शिंदेसेना, भाजपा, ठाकरे सेना आणि कॉँग्रेसचे उमेदवार देखील मैदानात

पैठणमध्ये नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत; युती-आघाडी फिसकटल्याने सर्वांचीच प्रतिष्ठा पणाला
- दादासाहेब गलांडे
पैठण : पैठण नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीचा राजकीय नकाशा आता स्पष्ट झाला असून, युती न झाल्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीत राजकीय तडजोड फसल्याचे समीकरण उघडकीस आले आहे. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी एकूण सहा उमेदवार अर्जदार आहेत, ज्यात राजकीय पार्श्वभूमी असलेले चार प्रमुख चेहरे तसेच दोन स्वतंत्र मुस्लिम महिला उमेदवारांचा समावेश आहे.
शहरात नगरपरिषद निवडणुकीसाठी शिंदेसेनेकडून विद्या भूषण कावसानकर, भाजपकडून मोहिनी सूरज लोळगे, उबाठा गटाकडून अपर्णा दत्तात्रय गोर्डे, तर काँग्रेसकडून सुदैवी योगेश जोशी हे प्रमुख उमेदवार आहेत. दोन स्वतंत्र मुस्लिम महिला उमेदवार मैदानात उतरलेल्या असल्यामुळे मुस्लिम मतांचे विभाजन होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्याचा फायदा शिंदेसेनेला होतो की आणखी कोणाला, हे येणारा काळ ठरविणार आहे.
पैठण नगरपरिषदेसाठी सर्वच राजकीय पक्षांची युती फिसकटल्याने उमेदवारांसमोर स्वतंत्र लढत अपरिहार्य झाली आहे. तसेच या गुंतागुंतीमुळे ही निवडणूक कधी नव्हे एवढी रोचक झाली आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) गटाने नगराध्यक्ष पदासाठी अर्ज मागे घेतल्यामुळे समीकरणे बदलली आहेत. तर अजित पवार गटाचे जितू परदेशी यांनी शिंदेसेनेसोबत युती केली आहे.
सर्वांची राजकीय प्रतिष्ठा पणाला
पैठण येथील नगरपरिषदेची निवडणूक ही अत्यंत रोचक बनली असून, बलाढ्य उमेदवारांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पैठणचे आमदार विलास भुमरे यांच्या प्रतिष्ठेसाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार असून, भाजपचे सूरज लोळगे आणि उबाठाचे दत्ता गोर्डे यांनीदेखील आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली आहे. माजी मंत्री अनिल पटेल यांनी काँग्रेसकडून उमेदवार उभा केल्यामुळे ही लढत चौरंगी आणि अधिक कठीण ठरली आहे. पैठण शहरात प्रचाराचे रणांगण लवकरच तापणार असून, निवडणूक निकाल शहराचे आणि परिसराचे राजकीय भविष्य ठरवणार आहे.