कुटुंबनियोजनाची जबाबदारी महिलांचीच का? नसबंदीला पुरुषांचा नकार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 16:30 IST2025-01-16T16:29:26+5:302025-01-16T16:30:38+5:30

जिल्ह्यात ३०६ पुरुषांच्या नसबंदी : कमजोरी येत असल्याची अंधश्रद्धा होतेय दूर

Why is family planning the responsibility of women? Men's rejection of sterilization! | कुटुंबनियोजनाची जबाबदारी महिलांचीच का? नसबंदीला पुरुषांचा नकार !

Why is family planning the responsibility of women? Men's rejection of sterilization!

लोकमत न्यूज नेटवर्क 
गोंदिया : वाढत्या लोकसंख्येवर आळा घालण्यासाठी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्या जातात; परंतु जिल्ह्यात कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्याचे महिलांचे प्रमाण यंदा कमी, तर पुरुषांचे प्रमाण दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक आहे. नसबंदी करायला महिला पुढे येतात. तसेच आता पुरुष मंडळीही नसबंदीसाठी पुढे येत आहेत. कमजोरी येईल असा असलेला गैरसमज दूर झाल्याने आता पुरुषही नसबंदी करायला पुढे येत आहेत. आता वाढत्या लोकसंख्येमुळे शासन कुटुंबनियोजनावर भर देत आहे; परंतु वाढत्या महागाईमुळे मुलांचे योग्य शिक्षण व त्यांचा राहणीमानाचा दर्जा सुधारण्यासाठी जास्त मुले होऊ नयेत असा आग्रह आता पालकांचा असतो. त्यामुळे 'आम्ही दोन, आमचे दोन' ही संकल्पना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राबविली जात आहे. काहींनी तर एकच मुलगा किंवा मुलीवर शस्त्रक्रिया करून कुटुंबनियोजन केले आहे. अधिक मुलांचे संगोपन करणे आजघडीला कठीण असल्याचे लक्षात घेत कमी अपत्यांवरच कुटुंबनियोजन करण्याचे ठरविले जात आहेत; परंतु कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करताना महिलांनाच पुढे केले जात होते. पुरुष मंडळी समोर येत नव्हती; मात्र आता पुरुष मंडळीही नसबंदी करण्यासाठी पुढे येत आहेत.

८७१० उद्दिष्ट शस्त्रक्रियांचे 
पुरुष शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट ५१०, तर स्त्री कुटुंबनियोजन शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट आठ हजार २०० आहे. असे एकूण आठ हजार ७१० शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट आहे.


३५३७ महिला, पुरुष केवळ ३०६ 
नसबंदी केल्यानंतर पुरुषांमध्ये कमजोरी येते असा गैरसमज होता; परंतु हळूहळू हा गैरसमज दूर होत आहे. दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक पुरुषांच्या शस्त्रक्रिया जिल्ह्यात होत आहेत. ३५३७ महिलांनी, तर ३०६ पुरुषांनी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्या आहेत.


एक दिवसाचा आराम पुरेसा 
स्त्री-पुरुष समानता असताना फक्त कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया स्त्रीने न करता पुरुषांनीही जास्त सहभाग घेऊन करावी. पुरुष नसबंदी सोपी व विनात्रास असणारी पद्धत असून कमी वेळेत व स्त्रीच्या तुलनेने कमी जोखमीची पद्धत आहे. शस्त्रक्रियेनंतर पुरुषांना एक दिवसाचा आराम पुरेसा आहे.


केवळ ३८४३ शस्त्रक्रिया 
महिला कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात करतात. जिल्ह्यात वर्ष २०२४-२५ या वर्षात तीन हजार ५३७ महिला व ३०६ पुरुषांनी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्या आहेत.


पुरुषांची नसबंदी अगदी सोपी पुरुष नसबंदी
या शस्त्रक्रियेत दोन्ही बाजूंच्या वीर्यनलिका कापून बांधल्या जातात. अंडकोशाच्या वरच्या भागात लहान छेद घेऊन ही नस बाहेर काढतात. ही शस्त्रक्रिया स्थानिक भूल देऊन प्राथमिक आरोग्य केंद्रातसुद्धा करता येते. 
पुरुष नसबंदी करताना विशिष्ट पद्धतीचा चिमटा वापरून ऑपरेशन करतात. त्यामुळे वीर्यामध्ये शुक्रतंतू मिसळणे प्रक्रिया थांबते.


"टाक्याची शस्त्रक्रिया ही चांगली असते. बिनटाका शस्त्रक्रिया असफल होऊ शकते. पुरुष नसबंदीमध्ये पुरुषांना वाटते की माझी लैंगिक शक्ती कमी होईल किंवा मला शारीरिकदृष्ट्या कमजोरी येईल अथवा शारीरिक संबंध ठेवण्यास काही अडथळा येईल. अशा काही भ्रामक कल्पनांमुळे पुरुषवर्ग शस्त्रक्रिया करण्यास पुढे येत नाही. पुरुषांनी शस्त्रक्रियेसाठी पुढे यावे." 
- डॉ. नितीन वानखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. गोंदिया.

Web Title: Why is family planning the responsibility of women? Men's rejection of sterilization!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.