गॅस पाइपलाइनसाठी जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 14:34 IST2024-12-12T14:33:04+5:302024-12-12T14:34:18+5:30

पाइपलाइनचे काम युद्धपातळीवर : पीक घेता येणार नसल्याने अडचण

Why are farmers against giving land for gas pipeline? | गॅस पाइपलाइनसाठी जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध का?

Why are farmers against giving land for gas pipeline?

लोकमत न्यूज नेटवर्क 
तिरोडा :
गोंदिया जिल्ह्यातून गेल इंडिया लिमिटेड कंपनीची गॅस पाइपलाइन जात आहे. यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून ही पाइपलाइन जात आहे त्या शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला देण्यात आला असला तरी ज्या ठिकाणाहून पाइपलाइन गेली आहे त्या ठिकाणी शेती व्यतिरिक्त इतर कोणतेही बांधकाम करता येऊ शकत नाही. परिणामी याला आता विरोध सुरू झाला असून या पाइपलाइनला कवलेवाडा येथील शेतकऱ्यांनी विरोध केला असून पाइपलाइनच्या कामासाठी जमीन देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. 


तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा येथील शेतकऱ्यांच्या शेतातून गेल इंडिया कंपनीच्या मुंबई-नागपूर ते झारसुकडा गॅस पाइपलाइनचे काम सुरू आहे. याकरिता अधिग्रहित करण्यात येत असलेल्या जमिनीचा मोबदला तज्ज्ञांकडून जमिनीच्या बाजारभावाच्या किमतीच्या फक्त १० टक्के रक्कम दिली जाणार आहे. जी बाधित क्षेत्राच्या तुलनेत खूप कमी आहे. गेल कंपनी वीस मीटर रुंद पट्टीची जमीन बाधित क्षेत्र म्हणून वापर करण्याचा हक्क बळजबरीने संपादित करणार आहे. २० मीटर रुंदीच्या पट्टीत शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येणार नाही. गुरांचा गोठा, तळे, विहिरी, पाण्याचा साठा किंवा कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येणार नाही. आपल्याच शेतात कोणत्याही प्रकारचे झाड लावता येणार नाही. गेलच्या कामाला घेऊन परिसरातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. म्हणूनच कवलेवाडा येथील शेतकरी आपली शेती गेल कंपनीला द्यायला तयार नाहीत. याविषयी शेतकऱ्यांशी तडजोड करायला उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी (म. राज्य), गेल इंडिया व त्यांची संपूर्ण टीम गावात आली होती. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात भविष्यात करणार असलेल्या योजना सांगितल्या व होणाऱ्या नुकसानीची योग्य ती भरपाई देण्याची व कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी मिळवून देण्याची मागणी केली. पण तुमच्या मागण्या जरी रास्त असल्या तरी आम्ही पूर्ण करू शकणार नाही असे सांगितले. यावर शेतकऱ्यांनी गॅस पाइपलाइनसाठी एकमताने विरोध केला. आमच्या परवानगीशिवाय शेतात कोणत्याही प्रकारचे काम करू नये, असे सांगितले. यामुळे गॅस पाइनलाइन काम बाधित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे. यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व शेकडो शेतकरी, नागरिक उपस्थित होते.


शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ
गेल इंडिया कंपनीच्यावतीने सुरू असलेल्या पाइपलाइनच्या कामामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. कंपनीच्या जाचक अटी शेतकऱ्यांना मारक ठरत आहेत. परिणामी गावागावात या पाइपलाइनला विरोध दर्शविण्यात येत आहे. आपल्याच शेतीत शेतकऱ्यांना आखलेल्या योजना व इतर उद्योग व्यवसाय करता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.

Web Title: Why are farmers against giving land for gas pipeline?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.