पत्नीला आणण्यासाठी गेला आणि मार खाऊन आला! सासरच्या मंडळीने केली जावयाला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 17:05 IST2024-08-31T17:04:37+5:302024-08-31T17:05:16+5:30
हिराटोला येथील घटना : पत्नीला आणण्यासाठी गेला होता सासरी

Went to get his wife and came back beaten!
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मुलगा आजारी असल्याने पत्नीला आणण्यासाठी सासरी गेलेल्या जावयाला पत्नीसह सासू, सासरा व साळ्याने धारदार शस्त्राने मारून जखमी केले. आमगाव पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम हिराटोला येथे गुरुवारी (दि.२९) दुपारी १ वाजता दरम्यान ही घटना घडली.
फिर्यादी अनमोल देवराम मेश्राम (२८, रा. ओवाळा, देवरी) हा ग्राम हिराटोला येथील आपल्या सासरी आरोपी पत्नी सुलेखा मेश्राम (२७) हिला आणण्यासाठी गेला होता. फिर्यादी सासूरवाडीत गेला असता त्याला आरोपी साळा सुशील बोरकर (२५) याने सुलेखा मेश्राम तुझ्यासोबत येत नाही तू निघून जा असे बोलला. यावेळी सुलेखा मेश्राम हॉलमध्ये बसून होती व फिर्यादी अनमोल मेश्राम याने तिला लहान मुलाची प्रकृती बरी नसल्याने तू घरी चल असे म्हटले. यावर सुलेखासह सासरा नीलकंठ सोमा बोरकर (५५), कांताबाई नीलकंठ बोरकर (५०) व सुशील बोरकर फिर्यादीच्या अंगावर धावून गेले व कोणत्या तरी धारदार वस्तूने मारले.
यानंतर फिर्यादीने घराबाहेर निघाल्यावर बघितले असता डाव्या खांद्याला व छातीच्या बाजूला मार लागून रक्त निघत असल्याचे दिसले. यावरही नीलकंठ बोरकर व कांताबाई बोरकर यांनी सुलेखा तुझ्यासोबत येत नाही असे बोलून भांडण व शिवीगाळ केली. पोलिसांनी भान्यासं २०२३ कलम ११८ (१), ३५२, ३५१, (२) (३), ३(५) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.