हजारो विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन घ्यावे लागतेय पडक्या शाळेत शिक्षण !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 18:19 IST2025-04-03T18:15:33+5:302025-04-03T18:19:01+5:30
२०० जीर्ण वर्गखोल्यांतून हजारो विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जन : १० कोटी मिळाले; २० कोटी कधी देणार?

Thousands of students are having to risk their lives to get education in abandoned schools!
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १ हजार ६४४ शाळा असून, लाखो विद्यार्थी शिक्षण घेतात. परंतु जिल्ह्यातील २०० वर्गखोल्या जीर्ण आहेत. मात्र, या जीर्ण झालेल्या वर्गखोल्यांमधून हजारो विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत असल्याची बाब पुढे आली आहे.
काही महिन्यांपूर्वी गोरेगाव तालुक्यातील साईटोला येथील जि. प. शाळेच्या जीर्ण झालेल्या इमारतीच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याने तीन विद्यार्थी जखमी झाले. या घटनेमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धोकादायक शाळेत शिकायला मुलांना पाठविणे आई-वडिलांना धोक्याचे वाटत आहे. शाळा आणि वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीमधून मागणी करण्यात आलेली आहे. या शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट जिल्हा परिषदेकडून केले जात नसून फक्त शाळा धोकादायक असल्यास याबाबत अहवाल दिला जातो.
२० वर्ग खोल्यांची त्वरित दुरुस्तीची गरज
जिल्ह्यातील २०० वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी ३० कोटी निधीची आवश्यकता आहे. यंदा या वर्गखोल्यांसाठी १० कोटी रुपयांचा निधी मिळालेला आहे. उर्वरित निधीची प्रतीक्षा आहे.
१० कोटींतून डागडुजी की नवीन बांधकाम ?
एका वर्गखोलीची डागडुजी (रिपेरिंग) केले तर ५ लाख रुपये लागतात. आणि नवीन वर्गखोली बांधली तर १५ लाखांची गरज असते. जिल्हा नियोजनमधून मिळालेल्या दहा कोटींतून फक्त रिपेरिंग केले तर २०० वर्गखोल्यांची डागडुजी होईल. परंतु नवीन वर्गखोली केली तर ६४ वर्गखोल्या नवीन बांधल्या जातील. आता शिक्षण विभाग संपूर्ण डागडुजी की नवीन इमारत बांधकाम करते, हे वेळ ठरवेल.
दुरुस्तीसाठी २० कोटींची गरज
शाळा आणि वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी एकूण ३० कोटींची गरज होती. मागील वर्षी जिल्हा नियोजन समितीमधून १० कोटी रुपये दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाला आहे. आणखी २० कोटींची गरज आहे.
निधी कधी मिळेल?
जिल्हा नियोजन समितीमध्ये यासाठी निधीची मागणी करण्यात आली असून, पालकमंत्र्यांच्या आदेशाने हा निधी उपलब्ध केला जातो. जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील २०० वर्गखोल्यांसाठी १० कोटी मिळालेत, उर्वरित निधी कधी मिळेल, असा जिल्हावासीयांचा सवाल आहे.
"गोंदिया जिल्ह्यातील जीर्ण वर्गखोल्यांसाठी १० कोटी रुपये मिळाले आहेत. त्यातून नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम केले जाणार आहे. वर्गखोल्यांच्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून नवीन वर्गखोल्या बांधल्या जाणार आहेत."
- सुधीर महामुनी, शिक्षणाधिकारी, गोंदिया