एमआयडीसीत नवे उद्योग नाहीत; जुनेही पडले बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 16:19 IST2024-12-18T16:09:16+5:302024-12-18T16:19:29+5:30

९८ पैकी ५३ उद्योगांना टाळे : केवळ ७०० जणांना मिळतोय रोजगार

There are no new industries in MIDC; old ones have also closed down. | एमआयडीसीत नवे उद्योग नाहीत; जुनेही पडले बंद

There are no new industries in MIDC; old ones have also closed down.

अंकुश गुंडावार 
लोकमत न्यूज नेटवर्क 
गोंदिया :
जिल्ह्यात आठ तालुके असले, तरी केवळ चारच तालुक्यांत एमआयडीसीत मोजके उद्योग सुरू आहेत. एकेकाळी वैभव असलेली गोंदिया येथील एमआयडीसी सुद्धा आता नावापुरतीच राहिली आहे. येथे उद्योग सुरू होण्याऐवजी बंद पडत असल्याने ९८ पैकी ५३ उद्योग बंद पडले आहेत. केवळ ४५ उद्योग सुरू असून त्यातून केवळ ७०० जणांना रोजगार मिळत आहे. तर, उद्योगांसाठी राखीव असलेल्या प्लाटवर केवळ उद्योजकांनी कब्जा करून ठेवला असून, त्यावर कुठलाही उद्योग सुरू न केल्याने गोंदिया एमआयडीसी केवळ नाममात्र ठरत आहे. 


गोंदिया जिल्ह्यातील अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवर आधारित आहे. या भागात सर्वाधिक धानाचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे येथे धानावर आधारित राईस मिल उद्योग सर्वात मोठा उद्योग आहे. जिल्ह्यात जवळपास १५५ वर राइस मिल आहे. येथील तांदळाची देश व विदेशात निर्यात केली जाते. गोंदिया येथील एमआयडीसीमध्ये सुद्धा राइस मिल उद्योग मोठा होता. तर, धानाच्या कोड्यांपासून वीज तयार करण्याचा प्रकल्प एमआयडीसीत सुरू होता. पण, गेल्या चार-पाच वर्षांपासून तो सुद्धा बंद पडला आहे. परिणामी अनेकांचा रोजगार बुडाला. येथील एमआयडीसीत उद्योगांसाठी १४६.१४ हेक्टर जागा उपलब्ध करून देत १९७ प्लॉट उद्योगजकांना विविध उद्योगांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले. त्यापैकी ११० प्लॉटवर राइस मिल, प्लास्टिक प्लांट, स्वामी नस प्रकल्प, छोटे-छोटे इतर उद्योग सुरू करण्यात आले होते. 


पण, कालांतराने विविध अडचणींमुळे यातील अनेक उद्योग बंद पडले. त्यामुळे सद्य:स्थितीत येथे केवळ ४५ उद्योग सुरू आहेत. यातही सर्वाधिक राइस मिलचा समावेश असून, त्यामुळे ७०० जणांना रोजगार उपलब्ध असल्याची माहिती एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या आठ-दहा वर्षांत एमआयडीसीत एकही नवीन उद्योग स्थापन झाला नाही. उलट जे उद्योग सुरू होते, त्यापैकी काही बंद झाले आहे. काही उद्योगांना कुशल रोजगार न मिळल्याने ते बंद पडल्याची माहिती आहे. त्यामुळे येथील एमआयडीसी केवळ नाममात्र ठरत आहे. 


उद्योगाच्या नावावर प्लॉटवर कब्जा 
एमआयडीसीमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी उद्योजकांना प्लॉट उपलब्ध करून देण्यात आले. यापैकी कित्येकांनी गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून त्या ठिकाणी कुठलाच उद्योग सुरू केला नाही. केवळ प्लॉटवर कब्जा करून ठेवला आहे. मात्र, त्यांच्यावर एमआयडीसी प्रशासनाकडून कुठलीच कारवाई करण्यात आली नाही.


अनेक भूखंड रिकामे 
एमआयडीसीत उद्योगासाठी एकूण १४६ हेक्टर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पण, यापैकी अनेक भूखंड गेल्या वीस ते २५ वर्षापासून रिकामे पडले आहेत. त्यांचा कसलाही उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. तर, या ठिकाणी उद्योग स्थापन व्हावे, यासाठी कुठलेच प्रयत्न केले जात नसल्याचे चित्र आहे.


...तर १५ हजार जणांना मिळेल रोजगार

येथील एमआयडीसीतील उद्योग पूर्णक्षमतेने सुरू झाल्यास १५ हजारांवर बेरो- जगारांना रोजगार मिळू शकतो. पण, येथील अनेक उद्योग बंद पडले असल्याने अनेकांना रोजगाराच्या शोधात पुणे, मुंबई, नागपूर येथे धाव घ्यावी लागत आहे.


"गोंदिया येथील एमआयडीसीत उद्योग स्थापन होण्यासाठी शासनाने सोयी सुविधा उपलब्ध करून त्यासाठी अनुकूल धोरण करण्याची गरज आहे. तसे केल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल व उद्योगांना चालना देण्यास मदत होईल." 
- हुकूमचंद अग्रवाल, अध्यक्ष एमआयडीसी गोंदिया.

Web Title: There are no new industries in MIDC; old ones have also closed down.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.