दिल्लीतील स्वातंत्र्य दिन सोहळ्याला भजेपारचे सरपंच विशेष अतिथी!
By अंकुश गुंडावार | Updated: August 1, 2025 15:18 IST2025-08-01T15:18:04+5:302025-08-01T15:18:44+5:30
स्मार्ट ग्रामच्या कार्याची घेतली दखल : जिल्ह्याचा गौरव

The Sarpanch of Bhajepar is the special guest at the Independence Day celebrations in Delhi!
सालेकसा : दिल्लीतील लाल किल्ल्यावर १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्वातंत्र्य दिन राष्ट्रीय परेड सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी तालुक्यातील भजेपार स्मार्ट ग्रामपंचायतीचे उपक्रमशील सरपंच तथा सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकुमार बहेकार यांना निमंत्रण मिळाले आहे. ते सहकुटुंब या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील १५ सरपंचांना दिल्ली येथील लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित सोहळ्यासाठी मानाच्या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. यात गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील भजेपार ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रकुमार बहेकार यांचा समावेश आहे. त्यांच्या निवडीमुळे संपूर्ण जिल्ह्याचा आणि सालेकसा तालुक्याच्या शीरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या विशेष निमंत्रणाचे श्रेय सरपंच बहेकार यांनी भारत सरकारच्या पंचायतराज मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, महाराष्ट्र शासन ग्राम विकास व पंचायतराज विभाग, गोंदिया जिल्हा परिषद, पंचायत समिती, सालेकसा प्रशासन आणि सेवेची संधी देणाऱ्या ग्रामपंचायत भजेपार येथील ग्रामस्थांंना दिले आहे.
अडीच वर्षात १ कोटी १० लाखांचे पुरस्कार
भजेपार ग्रामपंचायतीला मागील अडीच वर्षांत माझी वसुंधरा अभियान राज्यस्तरीय पुरस्कार ५० लाख रुपये, जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार ५० लाख रुपये, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान जिल्हास्तरीय तिसरे पुरस्कार (वर्ष २०२२-२३) ३.६० लाख रुपये, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार (वर्ष २०२४- २५) ६.६० लाख रुपये असे एकंदरीत १.१० कोटी रुपयांचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
ग्रामपंचायतीच्या या उपक्रमांची दखल
भजेपार ग्रामपंचायतीतर्फे राबविण्यात येणाऱ्या पर्यावरणपूरक, नाविन्यपूर्ण आणि सेवाभावी उपक्रमांची दखल घेऊन सरपंच बहेकार यांना सन्मानाची संधी मिळाली आहे. ग्रामपंचायत भजेपारअंतर्गत येणाऱ्या आरोग्य उपकेंद्रास सुंदर माझा दवाखाना, कायाकल्प आणि टीबीमुक्त पंचायत पुरस्कार प्राप्त झाला आहे. याव्यतिरिक्त सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक लोकोपयोगी उपक्रमांमुळे आणि विशेषतः भजेपार चषक आंतरराज्यीय महिला - पुरुष कबड्डी स्पर्धेमुळे या गावाची एक वेगळी ओळख जिल्ह्यासह राज्यात निर्माण झाली आहे.