पारा कोसळला; गोंदियामध्ये थंडी भलतीच वाढली, पारा ९ अंशांवर
By कपिल केकत | Updated: December 19, 2023 20:51 IST2023-12-19T20:51:04+5:302023-12-19T20:51:54+5:30
गार वारे सुटले, नोंदवलं गेलं यंदाचं सर्वात कमी तापमान

पारा कोसळला; गोंदियामध्ये थंडी भलतीच वाढली, पारा ९ अंशांवर
कपिल केकत, गोंदिया: मागील आठवडाभरापासून थंडीचा जोर वाढतच चालल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, आता दिवसा ऊन व सायंकाळी थंडी हा प्रकार थांबला असून, दिवसभर गार वारे सुटल्यामुळे गरम कपड्यांशिवाय वावरणे कठीण होत आहे. त्यातही मंगळवारी (दि. १९) पारा चांगलाच कोसळला असून, किमान तापमानाची ९ अंशांवर नोंद घेण्यात आली.
यंदाचे हे सर्वात कमी तापमान ठरले असून, गोंदिया व यवतमाळ जिल्हा विदर्भात पहिल्या क्रमांकावर होते.
डिसेंबर महिना लागूनही पाहिजे तशी थंडी पडली नसल्याने हिवाळ्याचा काही अंदाज जिल्हावासीयांना येत नव्हता. सकाळी व सायंकाळी थंडीचा जोर वाढत होता; मात्र दिवसा उन्हामुळे पाहिजे तसा हिवाळा जाणवत नव्हता. मात्र, मागील आठवडाभरापासून थंडीचा जोर दिवसेंदिवस वाढताना दिसला. आठवड्याभरापासून पारा १२ ते १३ अंशांदरम्यान वरखाली होत होता. मात्र, मंगळवारी (दि. १९) पारा चांगलाच घसरला असून, किमान तापमान थेट ९ अंशांवर आले होते. यंदाचे हे सर्वात कमी तापमान ठरले. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील मागील एक-दोन दिवसांपासून गारे सुटले असून, त्यामुळेही जिल्हावासीयांना हुडहुडी भरू लागली आहे. मंगळवारी गोंदिया व यवतमाळ जिल्हा विदर्भात पहिल्या क्रमांकावर होता.
रात्री लवकरच शुकशुकाट
थंडीचा जोर वाढू लागल्यामुळे रात्रीला आता फिरणाऱ्यांची गर्दी कमी झाल्याचे दिसत आहे. नागरिक आपली कामे आटोपून आता लवकरच घरात शिरत असल्यामुळे रात्रीला लवकरच रस्त्यांवर शुकशुकाट होत आहे. त्यातही जे बाहेर दिसतात ते शेकोटीच्या अवतीभवती घोळका करून असतात. विशेष म्हणजे, ग्रामीण भागात थंडी जास्त जाणवत असल्याने आता शेकोट्या पेटू लागल्या आहेत.
प्रथम पाच शहरांचे तापमान
शहर- किमान तापमान
- गोंदिया व यवतमाळ- ९
- नागपूर- ९.४
- वाशिम -१०
- गडचिरोली- १०.६
- चंद्रपूर- ११