बेरोजगारीची भीषण अवस्था ! डीएड, बीएड पदवीधर करताहेत 'रोहयोचे' काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 17:10 IST2025-03-13T17:09:08+5:302025-03-13T17:10:06+5:30
Gondia : शिक्षण डीएड, बीएड; वय तीस अन् काम 'रोहयोचे'

Terrible unemployment situation! D.Ed, B.Ed graduates are doing the work of 'rohayo'
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सद्यस्थितीत ४३८ ग्रामपंचायतींअंतर्गत सुरू असलेल्या २ हजार ९४२ कामांवर ९६ हजार ४१० मजूर काम करीत आहेत. आदिवासीबहुल नक्षलग्रस्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात उद्योगधंदे नसल्याने मनरेगा रामबाण उपाय आहे. परंतु मनरेगातूनही २.५० लाख मजुरांच्या हाताला काम न दिल्याने जिल्ह्यात बेरोजगारीत वाढ झाली आहे. मनरेगाच्या कामावर डीएड, बीएड अर्हताधारक तरुण काम करीत असल्याचे चित्र आहे.
केंद्र सरकारने बेरोजगारी दूर करण्यासाठी मागेल त्याला शंभर दिवस काम देण्याची हमी देणारी रोजगार हमी योजना अंमलात आणली. या योजनेतून वेगवेगळे लोकाभिमुख निर्णय घोषित केले जात आहेत. पण, कागदोपत्री मजुरांची संख्या दाखवून यंत्राच्या मदतीनेच बहुतांशी ठिकाणी कामे सुरू आहेत. यामुळे रोजगार हमी योजनेचा मजुरांच्या हाताला काम देण्याचा हेतू उद्देश पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात ४ लाख ६० हजार २५२ मजुरांनी जॉब कार्ड काढली आहेत. पण, त्यापैकी रोजगार हमीच्या कामावर ९६ हजार ४१० मजूर कार्यरत आहेत. अनेकांना कामाची प्रतीक्षा आहे, तर काहींनी केवळ जॉब कार्ड काढले नसून, त्यांना कामाची आवश्यकता नसल्याची माहिती आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी अधिनियम २००५ अंतर्गत गरिबांना जॉब कार्ड करून रोजगार देण्याची तरतूद आहे. वर्षातून शंभर दिवस केंद्राकडून कामाची हमी दिली जाते. परंतु काम दिले जात नाही.
२९४२ जिल्ह्यात ४३८ ग्रामपंचायतीं अंतर्गत २ हजार ९४२ कामे सध्या सुरू आहेत. ३१ प्रकारची कामे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून केली जातात. त्यातील घरकुल, नाला सरळीकरण, खडीकरण याच कामावर मजूर दिसतात.
शेती नाही, नोकरी नाही, लग्न जमेना
शेती नाही, शिक्षण असूनही नोकरी मिळाली नाही त्यामुळे ३० ते ३५ वर्षाचे होऊनही मुलांचे लग्न जमत नाही. प्रत्येक मुलीचे वडील हा नोकरदार मुलगाच हवा असा अट्टाहास घेऊन बसल्याने तरुणांचे लग्न जुळत नाही.
कोणत्या तालुक्यात
तालुका जॉब कार्ड मजूर उपस्थिती
आमगाव ४२१६१ ६५९७
सालेकसा ४२६०१ ०३८६
देवरी ५३८११ २०५०२
सडक-अर्जुनी ४७१८८ ७५३२
अर्जुनी-मोरगाव ६१८०३ १०८९४
गोरेगाव ४६५०४ ८४०४
तिरोडा ६९८३७ १८६०८
गोंदिया ९६३४७ ९६४१०
बेरोजगारांची फौज, पण रोहयोच्या कामाला नापसंती
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सुशिक्षित बेरोजगारांची फौज उभी आहे. परंतु काही लोक शरमेने रोहयोच्या कामावर येण्यास तयार नाहीत. पेमेंट कमी द्या परंतु खुर्चीवर बसण्याचे कामे द्या असा सूर सुशिक्षित तरुणांचा आहे.
जॉब कार्ड ४.६० लाख, मजूर केवळ ९६ हजार
गोंदिया जिल्ह्यात ३ लाख ६० हजार २५२ मजुरांनी जॉब कार्ड काढली आहेत. त्यापैकी रोजगार हमीच्या कामावर केवळ २६ हजार ४१० मजूर आहेत. अनेकांना कामाची प्रतीक्षा लागली आहे, तर काहींनी आवश्यकता नसताना कार्ड बनविल्याचे चित्र आहे.