सालेकसा येथे ईव्हीएम मशीनचे सील काढल्याने तणाव ; क्लोज बटनची शहानिशा करण्यासाठी सील काढले
By अंकुश गुंडावार | Updated: December 3, 2025 19:29 IST2025-12-03T19:24:22+5:302025-12-03T19:29:27+5:30
Gondia : राजकीय पक्षांनी या प्रक्रियेवर आक्षेप घेत क्लोजर बटनची शहानिशा करण्याची प्रक्रिया आवश्यक होती तर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर का करण्यात आली नाही.

Tensions rise after EVM machine seal is removed at Saleksha; Seal removed to check close button
सालेकसा : सालेकसा नगरपंचायतची निवडणूक २ डिसेंबर रोजी शांततेत पार पडली. सर्व केंद्राध्यक्षांनी मतदानाची माहिती सादर करून सीलबंद ईव्हीएम मशीन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सुपुर्द केल्यानंतर त्या स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यासाठी कंट्रोल युनिटमधील क्लोज बटनची शहानिशा करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका कांबळे यांनी सील काढायला लावले. ही माहिती राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना झाल्यानंतर त्यांनी बुधवारी (दि. ३) तहसील कार्यालय गाठून यावर आक्षेप घेत ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा आरोप केला. यावरून येथे सायंकाळपर्यंत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
राजकीय पक्षांनी या प्रक्रियेवर आक्षेप घेत क्लोजर बटनची शहानिशा करण्याची प्रक्रिया आवश्यक होती तर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर का करण्यात आली नाही. तसेच ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा आरोप करीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी लावून धरली. या प्रकरणाला घेऊन राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात एकच गोंधळ घातला. यामुळे बुधवारी तहसील कार्यालयात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून या ठिकाणी तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. तसेच जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी बॅरिकेट्स लावण्यात आले होते.
कोणत्याही निवडणुकीत मतदान सुरू होण्यापूर्वी सर्व पक्षांच्या प्रतिनिधींसमक्ष चाचणी मतदान घेऊन पुन्हा शून्यावर ठेवले जाते. निर्धारित वेळेत मतदान सुरू करून सायंकाळी मतदान संपल्यानंतर केंद्राध्यक्षांची दैनंदिनी आणि ईव्हीएममध्ये झालेले मतदान एकत्रित करून शेवटी क्लोज बटन दाबून ईव्हीएम मतदान प्रतिनिधी, केंद्राध्यक्षाद्वारे सील केले जाते. सील लागलेली ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये कडेकोट ठेवून मतमोजणीच्या दिवशीच सर्वांसमक्ष सील तोडून मतमोजणी केली जाते. परंतु, नगरपंचायत सालेकसा येथे मतदान केंद्रावरून सीलबंद करून आणलेली ईव्हीएम क्लोज बटनची शहानिशा करण्यासाठी सील तोडून खात्री करण्यात आली. परंतु, हे काम राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमक्ष करण्यात आले नाही. त्यामुळे यावर आक्षेप घेत राजकीय पक्षांनी गोंधळ घातला. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका कांबळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.
स्वीच पाहणी करण्यासाठी काढले सील
निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका कांबळे यांनी सांगितले की, ईव्हीएम मशीनचे स्वीच ऑन ऑफ आहे की नाही हे आम्ही कंट्रोल युनिट पाहिले व याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले असल्याचे सांगितले.
"नगरपंचायत सालेकसा येथे ईव्हीएमचे सील तोडण्यासंबंधी जो काही प्रकार घडला त्याची चौकशी करून तसा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला जात आहे. यावर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येईल."
- मिनाज मुल्ला, अतिरिक्त जिल्हाधिकारी गोंदिया.