शाळा वाचवण्यासाठी शिक्षक भरतोय पालकांची घरपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 18:26 IST2025-07-05T18:24:58+5:302025-07-05T18:26:09+5:30
Gondia : पुष्पनगर (अ) येथील जि. प. बंगाली शाळा : १३ विद्यार्थी घेत आहेत शिक्षण

Teachers are paying parents' rent to save the school
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा परिषद शाळा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. मात्र, यानंतरही परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या फारशी वाढत नसल्याचे चित्र आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पुष्पनगर (अ.) येथील जि. प. बंगाली शाळा सुरळीत ठेवण्यासाठी एका शिक्षकाने धडपड सुरू केली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षक स्वतःच्या पैशातून विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी आणि पाणीपट्टीची रक्कम भरत आहे.
एस. यू. देबनाथ असे शाळा टिकविण्यासाठी धडपणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पुष्पनगर (अ.) येथील जि. प. बंगाली शाळेत ते सहायक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. या शाळेची पटसंख्या कमी असल्याने शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे. पण, ही शाळा बंद होऊ नये, यासाठी शिक्षक देबनाथ यांनी विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी ते पालकांच्या घरी जाऊन त्यांच्या ग्रामपंचायतीची घरपट्टी आणि पाणीपट्टीची रक्कम भरत आहेत. पुष्पनगर (अ.) येथे १०० टक्के बंगाली लोक राहतात. येथे चौथीपर्यंत बंगाली शाळा आहे. शाळेत सध्या १३ विद्यार्थी शिकत आहेत. पटसंख्या कमी झाली तर शाळा बंद होण्याची भीती आहे. त्यामुळे शिक्षक देबनाथ यांनी हा नवीन प्रयोग सुरू केला आहे. या जि. प. शाळेत मुलांना शिकण्यासाठी पाठविणाऱ्या पालकांच्या घरी जाऊन त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिक्षक देबनाथ यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
आई-वडील नसलेल्या पाल्यांच्या शिक्षणाची जबाबदारी
ज्या विद्यार्थ्यांना आई-वडील नाहीत, त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची तयारीसुध्दा शिक्षक देबनाथ यांनी घेतली आहे. काहीही झाले तरी पुष्पनगर (अ.) येथील जि. प. शाळा बंद होऊ द्यायची नाही, असा संकल्प त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे शिक्षक देबनाथ हे गावातील पालकांच्या घरोघरी जावून पालकांना मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याचे आवाहन करीत आहे.
"शैक्षणिक क्षेत्रात स्पर्धा असल्यामुळे जि. प. शाळांचे अस्तित्व टिकवणे, हे मुख्य लक्ष्य आहे. शाळेत प्रथम इयत्तेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षण खर्चाची जबाबदारी घेतली आहे. कोणत्याही मुलाच्या पालकांपैकी एक किंवा दोघेही नसतील तर त्यांचा घरकर व पाणीकराची रक्कम भरण्याची जबाबदारी मी घेतली आहे."
-एस. यू. देबनाथ, सहायक शिक्षक, पुष्पनगर (अ.)