जादूटोण्याच्या संशयातून परिचराच्या अंगावर गाडी चढवून खून, आरोपीला अटक

By नरेश रहिले | Updated: October 2, 2022 19:44 IST2022-10-02T19:43:44+5:302022-10-02T19:44:05+5:30

आरोपीला ४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

Suspect of witchcraft, murder of an attendant by car, accused arrested | जादूटोण्याच्या संशयातून परिचराच्या अंगावर गाडी चढवून खून, आरोपीला अटक

जादूटोण्याच्या संशयातून परिचराच्या अंगावर गाडी चढवून खून, आरोपीला अटक

गोंदिया: माझ्या मुलाला जादूटोणा केला अन् ग्राम पंचायतच्या लाभापासून मला वंचीत ठेवले, असा समज करून एकाने ग्राम पंचायत परिचरावर चक्क टाटासुमो चढवून खून केल्याची घटना १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजता दरम्यान घडली. यशवंत सूरज मेंढे (५१) रा. दवनीवाडा असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मृतक दवनीवाडा ग्रामपंचायत येथे परिचर म्हणून कार्यरत होता.

आरोपी प्रवीण भैय्यालाल नेवारे (३८) याचे मृतक यशवंत सूरज मेंढे (५१) यांच्यासोबत जूने वाद होते. १ ऑक्टोबर रोजी ग्राम पंचायतचे कामकाज आटोपून ते घरी जाण्यासाठी ग्राम पंचायतमधून निघाले असता ग्राम पंचायतच्या गेटवर आरोपी प्रवीण नेवारे याने टाटा सुमो एमएच ३४ एए ९१४५ हीला त्यांच्या अंगावर चढविले. यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालय गोंदिया येथे दाखल करण्यात आले. उचारादरम्यान रात्री ९ वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

मृतक यशवंत मेंढे याने ग्रामपंचायत मधून मिळणाऱ्या लाभपासून मला वंचीत केले आणि माझ्या मुलास जादूटोणा केल्याचा संशयावरून आरोपीने हे कृत्य केल्याची चर्चा आहे. दवनिवाडा पोलिसांनी लगेच घटना स्थळ गाठून गावांतील परिस्थितीला सावरून आरोपी विरुद्ध भादंविच्या कलम ३०७, ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीला ४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल पाटील व पोलीस उपनिरीक्षक राऊत करीत आहेत.

Web Title: Suspect of witchcraft, murder of an attendant by car, accused arrested