महिला अधिकाऱ्याची रेकी करणारा वरिष्ठ सहायक निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 17:40 IST2025-07-05T17:39:55+5:302025-07-05T17:40:23+5:30
मुख्यालय दिले नाही : म्हणे, कारवाई सुरू आहे

Senior assistant suspended for harassing female officer
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा परिषदेच्या एका कनिष्ठ प्रशासन महिला अधिकाऱ्याने आपल्या विभागातील वरिष्ठ सहायकाविरोधात गोंदिया ग्रामीण पोलिसांत १ जुलै रोजी गंभीर तक्रार दाखल केली. तक्रारीवरून आरोपी वरिष्ठ सहायक बी. के. रणदिवे (५२, रा. ठाणा) याच्यावर गुन्हा दाखल केला. गुन्हा नोंद झाल्यानंतर जिल्हा परिषदेने त्याला संबंधित कर्मचाऱ्याला बुधवारी (दि. २) निलंबित केले आहे.
जिल्हा परिषदेतील एका विभागातील ४२ वर्षीय कनिष्ठ प्रशासन अधिकारी यांनी तक्रारीनुसार, दिलेल्या आरोपी वरिष्ठ सहायक बी. के. रणदिवे हे सुरुवातीला कार्यालयीन संवादाच्या निमित्ताने त्या महिलेशी संपर्क साधायचे. 'लहान ताई' अशा संबोधनाने बोलत होते. मात्र, मागील काही महिन्यांपासून तो त्यांना वारंवार फोन करीत होता. व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवून व्यत्यय आणायला सुरुवात केली. हा प्रकार इतर कर्मचारी व अधिकाऱ्यांनाही कळला होता. त्याच्या कृत्याने कंटाळलेल्या महिला कनिष्ठ प्रशासन महिला अधिकाऱ्याने याची तक्रार गोंदिया ग्रामीण पोलिस स्टेशनला केली. पोलिसांनी एफआयआर दाखल करताच त्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले.
परंतु निलंबनानंतर त्याचे मुख्यालय बदलणे अपेक्षित होते. मात्र, त्याला मुख्यालय अद्याप देण्यात आले नाही. मुकाअ बाहेर असल्यामुळे आल्यानंतर त्याचे मुख्यालय ठरविण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी फनिंद्र कुथीरकर यांनी सांगितले.
कार्यालयीन वेळेत सुरक्षा आम्ही करू
त्या महिला अधिकाऱ्याला नाहक त्रास झाल्यानंतर तिने या प्रकारासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रार केली. या तक्रारीच्या अनुषंगाने सकाळी ९ ते सायंकाळी ६ या काळात कार्यालयात आम्ही तुम्हाला सुरक्षा देऊ, त्यानंतर आम्ही सुरक्षा देऊ शकणार नाही, यासाठी तुम्ही एफआयआर करा, असा सल्ला सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुतीरकर यांनी त्या तक्रारकर्ता महिलेला दिला.