नागझिरा व्याघ्र प्रकल्पात आढळले दुर्मीळ युरेशियन पाणमांजर
By अंकुश गुंडावार | Updated: March 29, 2025 18:21 IST2025-03-29T18:20:32+5:302025-03-29T18:21:20+5:30
ट्रॅप कॅमेऱ्यात झाले छायाचित्र कैद : संवर्धनासाठी केल्या जाणार उपाययोजना

Rare Eurasian otter found in Nagzira Tiger Reserve
गोंदिया : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सध्या कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून वार्षिक व्याघ्र गणना सुरू आहे. त्यासाठी प्रकल्पाच्या गाभा व बफर क्षेत्रात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहेत. त्यात दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या युरेशियन पाणमांजर प्राण्याची कोका वनपरिक्षेत्रात पहिली छायाचित्रणात्मक नोंद झाली आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प व संलग्न भूप्रदेशात या युरेशियन ऑटर (युरेशियन पाणमांजर) या प्रजातीचा पहिलाच छायाचित्रणात्मक पुरावा आहे. चॅम्पियन व सेठ यांच्या भारतीय जंगलांच्या वर्गीकरणानुसार हे क्षेत्र उष्णकटीबंधीय शुष्क पानझडी वन या वर्गात मोडते. निरोगी उभयचर पर्यावरणाचे सूचक म्हणून काम करून गोड्या पाण्यातील आणि किनारी परिसंस्था राखण्यात पाणमांजर महत्त्वाची भूमिका बजावतात. भारतात पाणमांजराच्या तीन प्रजाती आढळतात. तिन्ही प्रजाती वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२, अनुसूची १ अंतर्गत संरक्षित आहे. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाद्वारे धोकाग्रस्त असे वर्गीकृत आहे. व्याघ्र गणनेच्या फेज-चौथ्या टप्प्यातील सर्वेक्षण आणि विश्लेषण नवेगाव नागझिरा व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानअंतर्गत वन्यजीव जीवशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत अंकित ठाकूर यांनी क्षेत्रसंचालक जयरामेगौडा आर, उपसंचालक पवन जेफ यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
१९७८ मध्ये मारुती चितमपल्ली यांनी घेतली नोंद
भारतात युरेशियन पाणमांजराचे वितरण प्रामुख्याने हिमालयीन पायथ्याशी, पश्चिम घाट आणि ईशान्य भारतातील काही भागात आढळते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध निसर्गशास्त्रज्ञ लेखक आणि वन अधिकारी पद्मश्री मारुती चितमपल्ली यांनी या क्षेत्रात कार्यरत असताना १९७८ मध्ये सध्याच्या गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिणेकडील भागात या प्रजातीची शेवटची नोंद केली होती. या व्याघ्र प्रकल्पातील उपस्थितीची ही पहिलीच छायाचित्रीत नोंद आहे. युरेशियन पाणमांजर आणि त्याच्या अधिवासाचे संरक्षण या प्रकल्पाच्या माध्यमातून केले जाणार आहे.