२ लाख ४० हजार शेतकऱ्यांपैकी केवळ १९ हजार शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 16:49 IST2024-05-21T16:48:02+5:302024-05-21T16:49:14+5:30
नुकसानभरपाईपोटी ८ कोटी ७५ लाख रुपये : अनेक शेतकरी लाभापासून राहिले वंचित

Out of 2 lakh 40 thousand farmers, only 19 thousand farmers benefit from crop insurance
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नैसर्गिक आपत्तीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी पिकांचा विमा काढतात. गेल्या खरीप हंगामात गोंदिया जिल्ह्यातील २ लाख ४० हजार ५४७ शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत १ रुपया भरून पिकांचा विमा काढला होता. खरीप हंगामातील पिकांना अवकाळी पावसाचा तडाखाही बसला होता; पण विमा कंपनीने २ लाख ४० हजार ५४७ शेतकऱ्यांपैकी केवळ १९ हजार ३५३ शेतकऱ्यांना नुकसानभरपाईसाठी पात्र ठरविले आहे. या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी ८ कोटी ७५ लाख ५६ हजार ६४५ रुपयांची मदत मंजूर केली आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास किमान त्यातून लागवड खर्च तरी भरून निघावा, यासाठी शेतकरी पिकांचा विमा काढतात; पण गेल्या तीन-चार वर्षांचा अनुभव पाहता पीकविम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नसून पीकविमा कंपन्या मात्र मालामाल होत असल्याचे चित्र आहे. दरवर्षी शेतकरी, केंद्र व राज्य शासन पीकविम्यापोटी कोट्यवधी रुपयांचे प्रीमियम विमा कंपन्यांकडे भरतात; पण नुकसान झाल्यानंतरही त्याचा परतावा शेतकऱ्यांच्या पदरात पडत नसल्याचे चित्र आहे. गेल्या खरीप हंगामापासून शासनाने पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत १ रुपयात पीकविमा काढण्याची योजना सुरू केली. याअंतर्गत जिल्ह्यातील २ लाख ४० हजार ५४७ शेतकऱ्यांनी प्रत्येकी १ रुपया भरून पिकांचा विमा काढला. खरीप हंगामात अवकाळी पाऊस, कीडरोगांचा प्रादुर्भाव यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांवर हंगामाला मुकण्याची वेळ आली होती; पण पीकविमा कंपन्यांनी नुकसानभरपाईसाठी केवळ १९ हजार ३५३ शेतकऱ्यांना पात्र ठरवीत जवळपास २ लाख २१ हजार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असून पीकविमा काढण्याकडे शेतकऱ्यांचा कल कमी होत असल्याचे चित्र आहे.
पात्रतेचे निकष काय?
विमा कंपन्या पीकविम्याचा लाभ देण्यासाठी वेगवेगळे निकष लावतात. यामुळे लाभासाठी फारच कमी शेतकरी पात्र होतात. विमा कंपनीचे निकष शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे.
पीकविम्याचा लाभ मिळालेले तालुकानिहाय शेतकरी
तालुका मिळालेली मदत पात्र शेतकरी
आमगाव २०१२९४५ ५९४
अर्जुनी मो. ८३८९३ ११
देवरी ४६०५५९ ४६
गोंदिया ५७१७१८२ १९७०
गोरगाव ४५०३१८५ ८७५
सडक अ. ६८७५६८ ८६
सालेकसा १५२९६०९ ४८५
तिरोडा ५७२४८९३६ १२०७४
एकूण ८ कोटी ७५ लाख ५६ हजार १९३५३