नॅक प्रमाणित महाविद्यालयांनाच मिळणार फ्रीशीप योजनेचा लाभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 16:57 IST2024-08-14T16:51:47+5:302024-08-14T16:57:06+5:30
विनोद मोहतुरे : समाज कल्याण विभागाची योजना

Only NAAC certified colleges will get the benefit of freeship scheme
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत महाडीबीटी पोर्टलवर भारत सरकार शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत ज्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न २.५ लक्षाच्यावर आहे त्या विद्यार्थ्यांना शिक्षणशुल्क, परीक्षाशुल्क प्रतिपूर्ती (फ्रीशीप) योजनेचा लाभ दिला जातो. असे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी कळविले आहे.
समाज कल्याण कार्यालयामार्फत जिल्ह्यातील महाविद्यालयांना, राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद द्वारा प्रमाणपत्र मिळाले असल्यास प्रमाणपत्र कार्यालयात सादर करणेबाबत कळविण्यात आले होते. त्यानुषंगाने नटवरलाल माणिकलाल दलाल कला आणि वाणिज्य महाविद्यालय गोंदिया, यशवंतराव कला महाविद्यालय महागाव / सिरोली, एस. एस. गर्ल्स महाविद्यालय गोंदिया, धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय गोंदिया, भवभूती महाविद्यालय आमगाव, मनोहरभाई पटेल कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सडक अर्जुनी, एम. एस. आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट कुडवा इत्यादी महाविद्यालयांनी राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेद्वारा प्राप्त प्रमाणपत्र कार्यालयामध्ये सादर केलेले आहे.
समाज कल्याण कार्यालयास प्राप्त माहितीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील वरील नमूद महाविद्यालयांना राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेद्वारा प्रमाणक (नॅक) दर्जा प्राप्त आहे. करिता वरील नमूद महाविद्यालयांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांनाच शिक्षण शुल्क, परीक्षाशुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ दिला जाईल. विद्यार्थी व पालकांनी प्रमाणपत्र पाहूनच प्रवेश घ्यावा. असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी केले आहे.