जहाल नक्षलवादी मिलींद तेलतुंबडेचा बॉडीगार्ड देवसू उर्फ देसु याचे गोंदियामध्ये आत्मसमर्पण

By नरेश रहिले | Updated: May 20, 2025 15:23 IST2025-05-20T15:21:51+5:302025-05-20T15:23:29+5:30

‘नक्षल आत्मसमर्पण योजने’चे मोठे यश

Milind Teltumbde bodyguard Deosu alias Desu surrenders in Gondiya | जहाल नक्षलवादी मिलींद तेलतुंबडेचा बॉडीगार्ड देवसू उर्फ देसु याचे गोंदियामध्ये आत्मसमर्पण

जहाल नक्षलवादी मिलींद तेलतुंबडेचा बॉडीगार्ड देवसू उर्फ देसु याचे गोंदियामध्ये आत्मसमर्पण

नरेश रहिले, गोंदिया: देशातील माओवादी चळवळीला प्रतिबंध व्हावा व अधिकाधिक माओवाद्यांनी आत्मसमर्पण करून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरता तसेच त्यांचे सामाजिक व आर्थिक पुनर्वसन व्हावे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनामार्फत ‘नक्षल आत्मसमर्पण योजना’ राबविली जात आहे. १९ मे २०२५ रोजी आणखी एका जहाल माओवादीने आत्मसमर्पण केले आहे. ३.५० लाखाचे बक्षीस असलेला जहाल माओवादी देवसू उर्फ देसु (मूळ नाव देवा राजा सोडी २४) रा. चिटिंगपारा/ गुंडम, पो ता. उसूर, जि. बिजापूर (छत्तीसगड) या प्लाटून मेंबरने आत्मसमर्पण केले आहे. (सीसी मेंबर दिपक उर्फ मिलिंद तेलतुंबडे (मृत) याचा बॉडी गार्ड) होता. १९ मे रोजी जिल्हाधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्यासमोर आत्मसमर्पण केले.

आत्मसमर्पित माओवादी देवसू उर्फ देसु उर्फ देवा हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील गावातील रहिवासी असून त्याचे गावात नक्षल्यांचे नेहमी येणे जाणे होते. नक्षलवादी जल, जंगल, आणि जमिनीच्या लढाई खाली भोळ्याभाबड्या आदिवासी नागरिकांना सरकार विरुद्ध भडकावून, तथाकथित व खोट्या क्रांती चे कथन करून लोकांना नक्षल चळवळीत ओढण्याचा प्रयत्न करायचे.त्यामुळे लहानपणापासून तो नक्षलयांच्या विविध प्रलोभन व भूलथापांना बळी पडून नक्षल विचारसरणीशी प्रभावित होऊन बाल संघटन मध्ये रुजू झाला. त्यानंतर ऑक्टोंबर २०१७ मध्ये पामेड पी.एल. ९ मध्ये भरती झाला आणि शासनाविरुद्ध शस्त्र हाती घेतले. डिसेंबर २०१७ मध्ये त्याला इतर काही नवीन भरती झालेल्या माओवाद्यांसह एम. एम. सी. झोन मध्ये पाठविण्यात आले.

एप्रिल २०१८ मध्ये तो आपल्या साथीदारांसह एम. सी. सी. झोन (विस्तार एरिया) मध्ये आला. तेथे दरेकसा, तांडा, मलाजखंड, पी.एल ३ या नक्षल दलम सोबत ८-१५ दिवस काम केल्यानंतर त्यास तत्कालीन एम. एम. सी. झोन प्रभारी मिलिंद उर्फ दीपक तेलतुंबडे (सेंट्रल कमिटी मेंबर / सद्या मृत) याचा अंगरक्षक म्हणून नेमण्यात आले होते. ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद भातनाते, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत हत्तीमारे, सहाय्यक फौजदार अश्विनीकुमार उपाध्याय, पोलीस हवालदार अनिल कोरे, पोलीस शिपाई अतुल कोल्हटकर, चंदन पटले, महिला पोलीस शिपाई लीना मेश्राम, चालक पोलीस नायक उमेश गायधने नक्षल सेल गोंदिया यांनी केली आहे.

नक्षलवाद्यांनो मुख्य प्रवाहात या!

माओवादी चळवळीचे समूळ उच्चाटन करण्याकरीता गोदिया जिल्हयात प्रभावी नक्षल विरोधी अभियान राबविण्यात येत आहे. विविध उपक्रम राबवून शासनाच्या कल्याणकारी योजनांची जनतेला माहिती देवून जनजागृती करण्यात येत आहे. जे माओवादी विविध भूलथापा आणि प्रलोभनांना बळी पडून माओवादी संघटनेत भरती झाले आहेत त्यांना हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट व्हावे.
- गोरख भामरे, पोलीस अधिक्षक गोंदिया.

अनेक नक्षल कारवायांत सहभाग

१३ नोव्हेंबर २०२१ रोजी मर्दिनटोला, जि. गडचिरोली येथे नक्षलवादी आणि पोलीस यांच्यात झालेल्या चकमकीत मिलिंद तेलतुंबडे यांच्यासह एकूण २८ नक्षलवादी मारले गेलेत. चकमकीतून माओवादी देवसु व काही साथीदार जीव वाचवून पळून गेले. तेथून माड एरिया मध्ये काम केले. त्यानंतर परत पामेड पी एल ८९ मध्ये मध्ये काम केले आहे. माओवादी देवसू उर्फ देसू उर्फ देवा याने सन २०१७-२०२२ मध्ये माओवादी संघटनेत कार्यरत असताना गोंदिया जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात घडलेल्या विविध गुन्ह्यात सहभागी असल्याचे कबूल केले.

पोलीस चिचगड कोसबी जंगल परिसरात पोलिस माओवादी चकमकीत सहभागी. सप्टेंबर २०१८, पोलीस ठाणे चिचगड अंतर्गत तुमडिकसा जंगल परिसरात पोलिस माओवादी चकमकीत सहभागी. (सप्टेंबर २०१८), पोलीस ठाणे गातापार (जिल्हा राजनांदगाव, सध्या खैरागड / छत्तीसगड) तांडा जंगल परिसरात पोलिस माओवादी चकमकीत सहभागी. बकोदा (कान्हा भोरमदेव एरिया) जंगल परिसरात पोलिस माओवादी चकमकीत सहभागी. (मार्च २०१९), मर्दीनटोला (जिल्हा गडचिरोली) जंगल परिसरात पोलिस माओवादी चकमकीत सहभागी (नोव्हेंबर २०२१) या कारवायांत त्यांचा समावेश आहे.

Web Title: Milind Teltumbde bodyguard Deosu alias Desu surrenders in Gondiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.