Maharashtra Election 2019 ; प्रचारतोफा थंडावणार आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 06:00 IST2019-10-19T06:00:00+5:302019-10-19T06:00:14+5:30
विधानसभा निवडणुकीचा जोर दिवसेंदिवस चांगलाच वाढत चालला आहे. उमेदवार मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानांचा वापर करीत आहेत. यात सोशल मीडियाचा वापर होत असतानाच जुन्या तंत्रांचाही तेवढाच बोलबाला आहे. हेच कारण आहे की, आजही पूर्वीप्रमाणेच ऑटो, रिक्शा व वाहनांवरील पोंग्यांचा ऐकी येतोच.

Maharashtra Election 2019 ; प्रचारतोफा थंडावणार आज
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सरण्याची वेळ आली असून शनिवारी (दि.१९) सायंकाळी ६ वाजता प्रचारतोफा थंडावणार आहेत. यामुळे सर्वत्र ऐकू येत असलेले गाणे व पोंग्यांचा आवाज आता शांत होणार आहे. प्रचार बंद पडणार असतानाच मात्र घरोघरी भेटीगाठीचा जोर वाढणार असून उमेदवार व त्यांचे कुटूंबीय यासाठी नियोजनाला लागले आहेत.
विधानसभा निवडणुकीचा जोर दिवसेंदिवस चांगलाच वाढत चालला आहे. उमेदवार मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानांचा वापर करीत आहेत. यात सोशल मीडियाचा वापर होत असतानाच जुन्या तंत्रांचाही तेवढाच बोलबाला आहे. हेच कारण आहे की, आजही पूर्वीप्रमाणेच ऑटो, रिक्शा व वाहनांवरील पोंग्यांचा ऐकी येतोच. चित्रपटांतील गाण्यांचा वापर करून त्यावर तयार करण्यात आलेले गाणे शहरात प्रत्येकच भागात ऐकू येत आहेत. तसेच उमेदवारांसाठी पक्षांतील दिग्गज नेत्यांच्या सभाही घेतल्या जात आहेत. यासोबतच उमेदवार रॅली काढून किंवा पायी फिरत मतदारांच्याजवळ जात आहेत.
निवडणुकीची ही सर्व रणधुमाळी सुरू असतानाच निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार,शनिवारी (दि.१९) सायंकाळी ६ वाजता प्रचाराच्या या तोफा थंडावणार आहेत. यामुळे शनिवारी सायंकाळपासून प्रचाराचे पोंगे व गाणे शांत होतील. शिवाय उमेदवारांसाठी घेतल्या जात असलेल्या नेत्यांच्या सभाही बंद होतील. अशात मात्र उमेदवार उरलेल्या अवधीत मतदारांच्या भेटीगाठीसाठी निघणार. उमेदवार व त्यांचे कुटूंबीय आपापल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदारांची भेट घेण्यासाठी निघतील.
सर्व पक्षांची शक्ती प्रदर्शनाची तयारी
७ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर ९ ऑक्टोबरपासून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराच्या रणधुमाळीला सुरूवात केली. गेली अकरा ते बारा दिवस पदयात्रा आणि प्रचारसभा धुराळा सुरू होता. मात्र निवडणूक आचारसंहितेनुसार मतदानाच्या ४८ तासांपूर्वी जाहीर प्रचार बंद करावा लागतो. त्यामुळे शनिवारी सायंकाळी ६ वाजेनंतर जाहीर प्रचार बंद होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून पदयात्रा काढून जोरदार शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता आहे.
मतदारसंघातील समीकरणात होतोय बदल
विधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. मतदानाची वेळ जस जशी जवळ येत आहे तसे तसे जिल्ह्यातील चारही मतदारसंघातील समीकरणात बदल होत आहे. एका मतदारसंघात दुहेरी आणि इतर तीन मतदारसंघात तिहेरी लढत होणार आहे. बंडखोरांमुळे मत विभाजनाचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मत विभाजन झाल्यास यांचा प्रमुख पक्षाच्या उमेदवारांना बसू शकतो.
फोन करून मतदानाचे आवाहन
जास्तीत जास्त मतदारांपर्यंंत पोहचण्यासाठी उमेदवारांची धडपड सुरू आहे. मात्र कितीही नियोजन केले तरी प्रत्येकापर्यंत पोहचणे शक्य नाही. अशात मात्र उमेदवारांनी आता नवी शक्कल लढविली आहे.उमेदवारांचे कार्यकर्ते आता क्षेत्रातील नागरिकांच्या मोबाईलवर संपर्क करून त्यांना आपल्यालाच मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. याशिवाय, सर्वांच्या मोबाईलवर मॅसेज पाठविले जात आहे.
आता थेट संपर्कावर भर
शनिवारी सायंकाळी ६ वाजतानंतर जाहीर प्रचार बंद होणार आहे.त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा आता थेट मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर भर असणार आहे. या दृष्टीने उमेदावाराचे नातेवाईक आणि मित्र परिवार सुध्दा मतदारसंघात सक्रीय झाले आहेत.