Maharashtra Election 2019 ; दिग्गज नेत्यांची गोंदिया जिल्ह्याकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 06:00 IST2019-10-16T06:00:00+5:302019-10-16T06:00:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतीम टप्प्यात आला असून प्रचारासाठी केवळ चार दिवस शिल्लक असताना गोंदिया ...

Maharashtra Election 2019 ; दिग्गज नेत्यांची गोंदिया जिल्ह्याकडे पाठ
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतीम टप्प्यात आला असून प्रचारासाठी केवळ चार दिवस शिल्लक असताना गोंदिया जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खा. प्रफुल्ल पटेल, वगळता एकाही पक्षाच्या मोठ्या नेत्याची सभा झालेली नाही. तर लगतच्या भंडारा जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारसभा झाल्या आहेत. त्यामुळे गोंदिया जिल्ह्याकडे सर्वच पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी पाठ दाखविल्याचे चित्र असून स्थानिक नेते आणि उमेदवाराच्या खांद्यावर प्रचाराची धुरा आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला ८ ऑक्टोबरपासून खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. निवडणूक रिंगणात भाजप-सेना युतीने जिल्ह्यातील चारही विद्यमान आमदारांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी काही नवीन जुन्यांना चेहऱ्यांना संधी दिली आहे.यासर्वच पक्षाच्या उमेदवारांनी जोरदार प्रचाराला सुरूवात केली आहे. युती आणि आघाडीचे स्थानिक नेते उमेदवारांसोबत मतदारसंघ पिंजून काढीत आहे.तर उमेदवार सुध्दा सकाळी ७ ते रात्री २ वाजेपर्यंत प्रचार कार्यात व्यस्त असल्याचे चित्र आहे. निवडणुकी दरम्यान पक्षाचे दिग्गज आणि जेष्ठ नेते त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जिल्ह्यात येतात.
त्यामुळे उमेदवारांना सुध्दा त्याची मदत होते. स्थानिक पदाधिकारी,कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होतो. मागील विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा झाल्या होत्या.तर या निवडणुकीत प्रचाराला शेवटचे चार दिवस शिल्लक असताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा.प्रफुल्ल पटेल वगळता मोठ्या नेत्याची सभा झालेली नाही.
त्यामुळे सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये यावरुन संभ्रम निर्माण झाला आहे. सर्वच पक्षाचे संघटन मंत्री, जिल्हाध्यक्ष आणि स्थानिक नेत्यांनी प्रचाराची सुत्रे हाती घेत उमेदवारासह मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे.
उमेदवारांचा लागतोय कस
जाहीर प्रचारासाठी आता केवळ चार दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.तर या कालावधीत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत कसे पोहचता येईल याचे नियोजन उमेदवार आणि त्या पक्षाचे नेते करीत आहे.सकाळी ७ वाजतपासून उमेदवार प्रचारासाठी मतदारसंघात सक्रीय होत असून रात्री २ वाजेपर्यंत ते घरी परत येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांना विश्रांती घेण्यासाठी वेळ मिळत नसल्याने प्रचारात त्यांचा चांगलाच कस लागत आहे.
होम मिनिस्टरसह कुटुंबीय प्रचारात सक्रिय
जिल्ह्यातील चारही मतदारसंघात एकूण ९५५ गावे असून या मतदारसंघातील सर्वच गावांपर्यंत एकाच वेळी पोहचणे उमेदवारांना शक्य होत नाही. त्यामुळे उमेदवाराची पत्नी आणि कुटुंबीय सुध्दा प्रचार करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. देखील सकाळपासून मतदारसंघात सक्रीय होऊन प्रचारासाठी मदत करीत आहे.
कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचा अभाव
जिल्ह्यात आतापर्यंत सर्वच पक्षाच्या दिग्गज नेत्यांच्या सभा झालेल्या नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सुध्दा उत्साहाचा अभाव दिसून येत आहे. उमेदवार आपल्यासोबत काही कार्यकर्त्यांना मनधरणी करुन नेण्यात काही प्रमाणात यशस्वी होत आहे.तर काही कार्यकर्तेअद्यापही पक्षाच्या प्रचार कार्यात सक्रीय झालेले नसल्याचे चित्र आहे.
चार दिवसात कोणते मोठे नेते येणार?
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता केवळ चार दिवस शिल्लक आहे.त्यातच आत्तापर्यंत एकाही मोठ्या नेत्याची सभा झालेली नाही. तर प्रचारासाठी नेते येणार असल्याचे संकेत सुध्दा नाही.त्यामुळे सर्वांचेच लक्ष पुढील चार दिवसात जिल्ह्यात कोणते मोठे नेते प्रचारासाठी येतात याकडे लागले आहे.