रेस्टॉरंटकरिता रिव्ह्यू द्या, घरबसल्या पैसे मिळवा; फेक मेसेज पडला महागात, तरुणाची ३.८८ लाख रुपयांची फसवणूक
By कपिल केकत | Updated: March 7, 2024 18:41 IST2024-03-07T18:38:17+5:302024-03-07T18:41:02+5:30
रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत न्यू लक्ष्मीनगर परिसरात २३ ते २९ फेब्रुवारी दरम्यान हा प्रकार घडला आहे.

रेस्टॉरंटकरिता रिव्ह्यू द्या, घरबसल्या पैसे मिळवा; फेक मेसेज पडला महागात, तरुणाची ३.८८ लाख रुपयांची फसवणूक
गोंदिया: गुगलवरील रेस्टॉरंटकरिता रिव्ह्यू दिल्यास घरबसल्या पैसे मिळणार, असा मेसेज पाठवून त्यानंतर तरुणाकडून टप्प्याटप्प्याने पैसे घेऊन तब्बल तीन लाख ८८ हजार ५०० रुपयांची फसवणूक करण्यात आली. रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत न्यू लक्ष्मीनगर परिसरात २३ ते २९ फेब्रुवारी दरम्यान हा प्रकार घडला आहे.
फिर्यादी संजोग प्रमोद दारोडकर (२६, रा. न्यू लक्ष्मीनगर) या तरुणाच्या मोबाइलवर गुगलवरील रेस्टॉरंटकरिता रिव्ह्यू दिल्यास घरबसल्या पैसे मिळतील असा मेसेज मोबाइल क्रमांक ९५७२७३३६५९ धारक रितूश्री बोउरूह एच.आर.फार्म स्कूल व्हुप इंडियन ऑनलाइन मीडिया पीवीटी. एलटीडी कंपनी दिल्ली या नावाने पाठविला. तसेच संजोगच्या व्हॉट्सॲपवर रेस्टॉरंटची गुगल लिंक पाठवून नंतर राधिका ०२३३६३ या टेलिग्राम आयडीची धारक राधिका मित्तल हे रेस्टॉरंटकरिता रिव्ह्यू करण्यासाठी २१ टास्क करावे लागतील.
त्याबद्दल रिव्ह्यूचे पैसे मिळतील असे सांगून टेलीग्राम गुगल रिव्हयू टीम-७०३२ या ग्रुपमध्ये समाविष्ट केले. त्यानंतर तिवारी-१२३०३ या टेलीग्राम आयडी धारक किसन तिवारी याच्याशी संगनमत करून किसन तिवारीने टेलीग्रामवर जॉईन मिशन -७९ या ग्रुपमधये समाविष्ट करून घेत १०-१२ टास्कच्या टप्प्यांमद्ये १५०००, ३६,००० व ९७,८००, अडकलेले पैसे परत मिळविण्यासाठी रिपेअर ऑर्डर करिता २,३८,००० रूपये राधिका मित्तलने फिर्यादीच्या टेलिग्रामवर पाठविलेल्या वेगवेगळ्या यूपीआय आयडीवर सेंड करण्यास लावून फिर्यादीची ३,८८,५०० रुपयांची फसवणूक केली. पोलिसांनी भादंवि कलम ४२० सहकलम ६६ डी माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
या लोकांवर झाला गुन्हा दाखल
या प्रकरणात मोबाइल क्रमांक ९०५४६७९४४६ नंबरधारक आणि टेलिग्राम, राधिका ०२३३६३ धारक राधिका मित्तल (न्यू दिल्ली) तसेच टेलिग्राम आयडी तिवारी १२३०३ चा धारक किसन तिवारी (न्यू दिल्ली) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.