गोंदिया जिल्ह्यातील २५९ धार्मिक स्थळांवरील भोंगे काढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 19:14 IST2025-08-22T19:11:19+5:302025-08-22T19:14:34+5:30
आस्थापना पदाधिकाऱ्यांचे सहकार्य : बैठकांमधून पोलिस विभागाचे मार्गदर्शन

Horns removed from 259 religious places in Gondia district
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहे. त्याच अनुषंगाने गोंदिया पोलिस विभागाकडून धार्मिक स्थळ व इतर आस्थापनांवरील अनाधिकृतपणे लावलेले भोंगे, लाऊडस्पीकर स्वतःहून काढून टाकण्याबाबत पोलिस स्टेशन स्तरावर धार्मिक व इतर आस्थापनांच्या पदाधिकारी यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले जात आहे. याला धार्मिक व इतर आस्थापना समित्यांचे सहकार्य मिळत आहे. त्यांच्याच सहकार्याने आतापर्यंत जिल्ह्यातील २५९ धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले आहे.
जिल्ह्यातील बहुतांश धार्मिक स्थळ व इतर आस्थापनांवरील भोंगे, लाऊडस्पीकर इत्यादी स्वयंस्फूती व सामंजस्याने संबंधित आस्थापनांचे पदाधिकारी यांच्याकडून काढण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १८० मंदिर, ४५ मस्जीद, १ गुरुव्दारा, ३३ बौध्द विहार असे एकूण २५९ धार्मिक आस्थापनावरील भोंगे काढण्यात आलेले आहेत. गोंदिया जिल्हा पोलिस दलातर्फे धार्मिक आस्थापना व इतर आस्थापनांचे पदाधिकारी यांनी धार्मिक स्थळ इतर आस्थापनांवरील भोंगे लाऊडस्पीकर आदी स्वतःहून काढण्याची कार्यवाही करून पोलिस विभागास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी
उच्च न्यायालयाने क्रिमिनल रिट पिटीशन नं. ४७२९/२०२१ या संदर्भात बेकायदेशीररित्या बसवलेल्या लाऊडस्पीकर इत्यादीमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाबाबत कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यात धार्मिक स्थळ व इतर आस्थापनांवर अनधिकृत भोंगे, लाऊडस्पीकर इत्यादी आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार.