गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टी, २१ मार्ग बंद; शाळांना सुट्टी जाहीर
By अंकुश गुंडावार | Updated: July 8, 2025 14:19 IST2025-07-08T14:18:08+5:302025-07-08T14:19:24+5:30
२४ तासात ११० मिमी पावसाची नोंद : पुजारीटोला, संजय सराेवरचे दरवाजे उघडले

Heavy rains in Gondia district, 21 roads closed; Holiday declared for schools
गोंदिया : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरु असून मंगळवारी (दि.८) तिसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम असल्याने गेल्या चौवीस तासात सरासरी ११० मिमी पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आला असून जिल्ह्यातील २१ मार्ग बंद झाले आहे. धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने पुजारीटोला धरणाचे ४ व संजय सरोवरचे २ दरवाजे उघडण्यात आल्याने नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने जिल्ह्यात मंगळवार आणि बुधवारी मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. तो अंदाज खरा ठरला. जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असल्याने जिल्ह्यात सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्तकतेचा इशारा म्हणून जिल्हा प्रशासनाने मंगळवारी (दि.८) शाळांना सुटी जाहीर केली. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.नागपूर-रायपूर राष्ट्रीय मार्गावरील मासूलकसा घाट परिसरातील दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. तर रस्त्यावर पसरलेले दगड हटविण्याचे काम संबंधित विभागाने सुरु केले होते. पावसामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १०, देवरी १० व गोंदिया तालुक्यातील १ मार्ग बंद झाला होता. जिल्ह्यात गेल्या २४ तासात ११० मिमी पावसाची नोंद झाल्याने अतिवृष्टी झाली आहे. तर पावसाचा जोर कायम असल्याने जिल्ह्यातील पूर परिस्थिती वाढ होण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा
मध्यप्रदेशातील शिवनी जिल्ह्यातील संजय सरोवर धरणाचे दोन गेट ३ फूट उंचीपर्यंत उघडण्यात आले. यामुळे वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वैनगंगा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी देखील सतर्क रहावे. जिल्हा प्रशासनाने सर्व आपत्कालीन यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीचेच पालन करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने केले आहे.
हे मार्ग आहेत बंद
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वडेगाव ते खोलदा, दिनकरनगर ते करांडली, प्रतापगड ते कडोली, प्रतापगड ते रामनगर, इळदा ते वडेगाव, नवेगावबांध परिसरातील रामपुरी गावादरम्यान असलेल्या पुलावर पाणी आल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद झाला. बोरी ते मांडोखाल, कोरंबीटोला ते मांडोखाल, सिलेझरी ते येरंडी (विहीरगाव), महागाव, शिरोली, ईटखेडा, बोंडगावदेवी ते खांबी आणि चान्ना ते बोंडगावदेवी मार्ग काही वेळात बंद होण्याची शक्यता आहे. देवरी तालुक्यातील चिचेवडा ते मुरदोली, डवकी ते शिलापुर, गोटाबोडी ते बोरगाव, शेडेपार रस्ता, निलज, घोनाडी, सिंगांडोह-रोपा नाला, ककोडी चिलाटी नाला, परसोडी जवळ (चिचगड–देवरी रोड) तर आमगाव तालुक्यातील किंडगीपार ते जवरी, किंडगीपार ते शिवनी, जामखारी ते धावडीटोला, कालीमाटी ते सुपलीपार, सुपलीपार पाटीलटोला ते मोहगाव रस्ते बंद झाले आहेत.
रोवणी पाण्याखाली
जिल्ह्यात २५ टक्के रोवणीची कामे आटोपली होती. मात्र गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असून गोंदिया, अर्जुनी मोरगाव, देवरी, तिरोडा तालुक्यातील हजारो हेक्टरमधील रोवणी पाण्याखाली आल्याचे चित्र आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास केलेली रोवणी वाहून जाण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावित आहे.
गोंदिया शहरातील रस्त्यांवर साचले पाणी
संततधार पावसामुळे गोंदिया शहरातील अनेक रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले होते. कचरा मोहल्ला परिसरातील अंडरग्राऊंड पुलाखाली गुडघाभर पाणी साचल्याने या मार्गाने वाहतूक बंद झाल्याने शहरवासायींना याचा फटका बसला. तर संततधार पावसामुळे
नगर परिषदेच्या मान्सूनपूर्व कामांची पोलखोल झाली.
जिल्ह्यात गेल्या २४ तासात तालुकानिहाय झालेला पाऊस
तालुका झालेला पाऊस
- गोंदिया ७९.२ मिमी
- आमगाव ५३.२ मिमी
- तिरोडा १२० मिमी
- गोरेगाव ५९.५ मिमी
- सालेकसा ७५.७ मिमी
- देवरी १९८ मिमी
- अर्जुनी मोरगाव २०६.९ मिमी
- सडक अर्जुनी ७४.०मिमी
- एकूण ११०.६ मिमी