२०१९ मध्येच आम्हाला अक्कल आली असती, तर चित्र वेगळे असते; देवेंद्र फडणवीस
By अंकुश गुंडावार | Updated: October 13, 2024 16:44 IST2024-10-13T16:44:14+5:302024-10-13T16:44:52+5:30
"पटोले, केदार यांच्याकडून लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी प्रयत्न"

२०१९ मध्येच आम्हाला अक्कल आली असती, तर चित्र वेगळे असते; देवेंद्र फडणवीस
गोंदिया: कधी कधी आम्ही पण चूक करतो. आम्हाला याची जाणीव निवडणुकीनंतर झाली. आमचा मुलगा किती मोठा आहे हे आज आम्हाला कळले. २०१९ मध्येच आम्हाला अक्कल आली असती गोंदिया विधानसभा क्षेत्रात कमळ फुलले असते. आता ती चूक आम्ही परत करणार नाही. काही लोक पक्षात केवळ संधी साधून घेण्यासाठी आले होते. ते आता आपल्या मूळ ठिकाणी गेले आहेत. त्यामुळे या क्षेत्राच्या विकासाला निश्चितच गती मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
गोंदिया येथे रविवारी (दि.१३) आ. विनोद अग्रवाल यांच्यावतीने आयोजित कर्तव्यपूर्ती जनआशीर्वाद मेळाव्यात ते बोलत होते. फडणवीस म्हणाले आ. विनोद अग्रवाल हे गेल्या निवडणुकीत अपक्ष लढले व ते निवडून आले. पण यानंतरही ते सदैव आमच्यासोबत होते. गेल्या पाच वर्षांत या विधानसभा क्षेत्रात जेवढी कामे झाली तेवढी कामे यापूर्वी कधीच झाली नाही. डांगोरर्ली उपसा सिंचन योजना, पिंडकेपार प्रकल्पासाठी त्यांच्याच पाठपुराव्यामुळे निधी मंजूर करण्यात आला. या दोन्ही योजनांचे श्रेय केवळ त्यांना आहे. यात दुसऱ्या कुणाचीही भूमिका नाही. पण काहीजण अजूनही सर्व आम्हीच केले असे सांगतात. मला तर कधी कधी असे वाटते की, भाजपची स्थापनासुद्धा त्यांनीच केली असावी अशी टीका त्यांनी नाव न घेता काँग्रेसमध्ये घरवापसी केलेल्या माजी आमदारावर केली.
"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
आ. विनोद अग्रवाल यांनी गेल्या निवडणुकीत चावी संघटनेची स्थापना करून अपक्ष निवडणूक लढविली होती. पण आता भाजपमध्ये पुन्हा सक्रिय झाले आहे. त्यांना आम्ही चावी खिशात ठेवून कमळ हाती घेण्यास सांगितले आणि ते त्यांनी ऐकले आहे. त्यामुळे या क्षेत्राचा विकास आता त्यांच्याच नेतृत्वात अधिक गतीने करायचा असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आ. डॉ. परिणय फुके यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. आ. विनोद अग्रवाल यांनी पद, प्रतिष्ठा व राजकारण करण्यासाठी मी आमदार झालो नाही तर गाेरगरीब आणि सर्वसामान्यांचे कल्याण करण्यासाठी निवडणूक लढविल्याचे सांगितले.
🕝 दु. २.२५ वा. | १३-१०-२०२४📍 गोंदिया.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 13, 2024
LIVE | कर्तव्यपूर्ति जन आशीर्वाद महासम्मेलन#Maharashtra#Gondiahttps://t.co/bcw6vLaFB1
पटोले, केदार यांच्याकडून लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी प्रयत्न
महायुती सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. पण या योजनेमुळे विरोधकांच्या पोटात दुखणे सुरू झाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व माजी मंत्री सुनील केदार यांनी लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. पटोले यांच्या कार्यालयात काम करणाऱ्याच व्यक्तीने ही याचिका दाखल केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.